Home अश्रेणीबद्ध सरपंचाची हत्या करणाऱ्या सात आरोपींना जन्मठेप

सरपंचाची हत्या करणाऱ्या सात आरोपींना जन्मठेप

0

कल्याण : ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ११ एकर सरकारी जमीन देण्याबाबतचा ना-हरकत दाखला दिला नाही, म्हणून कल्याण तालुक्यातील गेरसे गावचे सरपंच हरिभाऊ दिवाणे यांच्यावर अ‍ॅसिड टाकत, २५ जणांच्या जमावाने मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना २५ सप्टेंबर १९८६ रोजी घडली होती. तब्बल ३२ वर्षांनंतर या गुन्ह्यातील सात आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. अनिल सुब्रह्मण्यम यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

कल्याण तालुक्यातील गेरसे गावचे सरपंच हरिभाऊ दिवाणे यांनी ग्रामपंचायतीच्या ताब्यातील सरकारी जमिनीपैकी ११ एकर जमीन बाळू गायकर (रा. वासिंद) यांच्या नावे करून देण्यास नकार दिला होता. या वादातून २५ सप्टेंबर १९८६ रोजी बाळूसह २५ जणांचा जमाव हरिभाऊ यांच्या घरावर अ‍ॅसिड, काडतुसे, लाठ्याकाठ्या, तलवार आणि कुºहाडी घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी दुकानात जात असलेल्या हरिभाऊच्या पुतण्याला जमावाने शिवीगाळ केली. जमावाच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांचे काका वसंत तिथे गेले असता, जमावाने त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात हरिभाऊ यांच्यासह त्यांच्या घरातील १२ जण जखमी झाले होते. सरकारी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी हरिभाऊ यांना मृत घोषित केले.
 

याप्रकरणी हरिभाऊ यांचे भाऊ नारायण यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कल्याण न्यायालयाने या प्रकरणात नऊ साक्षीदार आणि पुरावे तपासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाळू ऊर्फ लखा गायकर (रा. वासिंद), भाऊ दिवाणे, पांडुरंग दिवाणे, लक्ष्मण दिवाणे, एकनाथ दिवाणे, सुरेश गायकर आणि चंद्रकात गायकर (सर्व रा. गेरसे, ता. कल्याण) या सात आरोपींना जन्मठेपेसह ५० हजारांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली.

सुमारे ३२ वर्षांनंतर या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली असून, आता बहुतांश आरोपींचे वय ६५ ते ७० च्या जवळपास आहे. २५ पैकी ११ आरोपींचा खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच मृत्यू झाला असून, खटल्यातील काही साक्षीदारांचादेखील मृत्यू झाला आहे.