Home बातम्या Maharashtra CM: दोन काँग्रेसचे, दोन राष्ट्रवादीचे… उद्धव ठाकरेंसोबत ‘हे’ चार नेते घेणार मंत्रिपदाची शपथ!

Maharashtra CM: दोन काँग्रेसचे, दोन राष्ट्रवादीचे… उद्धव ठाकरेंसोबत ‘हे’ चार नेते घेणार मंत्रिपदाची शपथ!

0

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार अखेर सत्तेत येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे चार मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळणार असून, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. तीन तारखेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहितीसुद्धा खात्रीलायक सूत्रांकडून आता मिळाली आहे.  

या किमान समान कार्यक्रमांतर्गत काँग्रेसला 13 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. यात 9 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपद येऊ शकतात. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गृह आणि महसूल विभागासंदर्भात चर्चा सुरू आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिल्यामुळे राष्ट्रवादीला गृह मंत्रालय मिळणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसला महसूल खातं देण्यासंदर्भात ठरल्याचंही सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला आहे. 

शिवसेनेचे 8 आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 9-9 नेत्यांना मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, सतेज बंटी पाटील, सुनील केदार यांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे यांना मंत्री बनवलं जाऊ शकतं.