Home गुन्हा ‘कल्याण- मुंबई’ला आले जिंतुरात सुगीचे दिवस

‘कल्याण- मुंबई’ला आले जिंतुरात सुगीचे दिवस

0

जिंतूर : सहा महिन्यांपूर्वी बंद असणारा जुगार आता मात्र खुलेआमपण जिंतूर शहरासह तालुक्याच्या विविध ठिकाणी सुरु असून पोलीस प्रशासन याकडे मात्र कानाडोळा करीत आहे. 

शहरासह ग्रामीण भागात जिंतूर येथे नव्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आल्यापासून जुगार व अवैध धंदे बंद होते. गणेशोत्सव बंदोबस्त व विधानसभा निवडणूक संपल्यानंतर या अवैध धंद्येवाल्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिंतूर शहरात ७ ते ८ मुख्य बुकी असून इतर अनेक एजंट शहराच्या विविध भागात आहेत. शहरातील मोंढा परिसर, जिल्हा परिषद शाळेचे मैदान, बसस्थानक, शिवाजी चौक या भागामध्ये कल्याण- मुंबई या नावाच्या जुगाराचे अनेक एजंट पहावयास मिळतात. विशेष म्हणजे, गुपचूपपणे सुरु असताना व मोबाईलद्वारे छुप्या मार्गाने सुरु असणारा हा जुगार मागील दोन महिन्यांपासून चिठ्ठ्या देऊन बिनबोभाटपणे सुरु आहे. मुंबई- कल्याण या मटक्याबरोबरच शहरामध्ये काही ठिकाणी पत्याचे क्लबही राजरोसपणे सुरु आहेत. याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष दिसत आहे.  

तालुक्यामध्ये ग्रामीण भागात येलदरी, इटोली, चारठाणा येथेही मोठ्या प्रमाणावर कल्याण- मुंबई मटका घेतला जातो. बोरी परिसरातही अनेक भागामध्ये मटका राजरोसपणे सुरु आहे. एकीकडे पोलीस प्रशासन अवैध धंदे बंद असल्याचे सांगत असले तरी प्रशासनातील काही कर्मचाºयांशी हातमिळवणी करुन हा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरु आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसते. ग्रामीण भागात कल्याण- मुंबई जुगाराबरोबरच पत्याचे क्लबही राजरोसपणे सुरु आहे. आसेगाव, दुधगाव, वस्सा, कौसडी, चारठाणा, येलदरी या भागात अनेक पत्याचे क्लब चालतात. याकडेही त्या त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. येलदरीमध्ये तर खुलेआमपणे मटका, क्लब व अवैध दारु विक्री जोरात सुरु आहे. 

ऑनलाईन लॉटरीचा : व्यवसायही तेजीत
मुंबई, कल्याण जुगाराप्रमाणेच ताबडतोब निकाल लागत असल्याने आॅनलाईन लॉटरीही मोठ्या प्रमाणावर जिंतूर  तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. या लॉटरी व्यावसायिकांना कोणतीही परवानगी नाही. हा जुगाराचाच एक प्रकार असून स्थानिक कर्मचाºयांना हाताशी धरुन हा अवैध ऑनलाईन मटका बिनबोभाटपणे सुरु आहे. 

अवैध दारु विक्रीकडे दुर्लक्ष
जिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात सर्रास अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक, पानपट्टी व दुकानात सर्रासपणे देशी व विदेशी दारु मिळते. याकडे पोलीस प्रशासनाचे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. 

जिंतूर तालुक्यामध्ये अवैध धंदे सुरु असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर फंटरवर कारवाई करण्याऐवजी मुख्य बुकी चालकांच्या मुसक्या आवळू व अवैध धंदे कायमचे बंद करण्यासाठी प्रयत्न करु.
– श्रवण दत्त, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिंतूर