Home बातम्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 8 फेब्रुवारीला मतदान, तर 11 रोजी मतमोजणी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 8 फेब्रुवारीला मतदान, तर 11 रोजी मतमोजणी

0

नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले. आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी  8  फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यापासून दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ”दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 1.46 कोटी मतदार मतदान करतील.   13 हजार 750 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाईल. मतदान केंद्रांवर दिव्यांग आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा दिली जाईल. तसेच 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक पोस्टल बॅलेटद्वावर मतदान करू शकतील.” 

या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. 

2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता. 

दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आप आणि काँग्रेसला मात देत दिल्लीतील सात पैकी सात जागांवर कमळ फुलवले होते. त्यावेळी 70 पैकी 65 विधानसभा मतदारसंघात भाजपाला आघाडी मिळाली होती. तर काँग्रेसला 5 मतदारसंघात आघाडी मिळाली होती. तर आपला एकाही मतदार संघात आघाडी मिळाली नव्हती.  मात्र दिल्लीतील मतदारांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी वेगवेगळा कौल देण्याचा कल पाहता दिल्लीतील राजकीय समीकरण गुंतागुंतीचे बनलेले आहे.