Home ताज्या बातम्या महाराष्ट्राची सत्ता योग्य वेळी हाती आली

महाराष्ट्राची सत्ता योग्य वेळी हाती आली

0

बारामती : बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने शेती संदर्भातील कृतिशील प्रयोगाद्वारे अभिमान वाटावा असे काम केले आहे. राजकीय मतभेद वेगळे असतील मात्र चांगले काम नाकारणे म्हणजे करंटेपणाचे होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवार कुटुंबीयांचे कौतुक केले. महाराष्ट्राची सत्ता योग्य वेळी हाती आली असे सांगण्यास मुख्यमंत्री विसरले नाहीत.

ऍग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘कृषिक-2020’ प्रत्याक्षिकयुक्त कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री म्हणाले, मी अनेक शेतीशी निगडीत प्रदर्शने पाहिली, मात्र प्रात्यक्षिकासह शेती काय असते, याचे तत्वज्ञान सांगणारे भारतातील एकमेव प्रदर्शन म्हणजे कृषिक 2020 आहे. हवीहवीशी वाटणारी शेती हवेतच झाली तर किती आनंद होईल, असा आनंद बारामतीच्या कृषी प्रदर्शनात प्रत्यक्ष हवेतील शेती पाहून अनुभवयास मिळाला.

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे सरकारचे काम आहे. ते आम्ही राज्यकर्ते म्हणून एकदिलाने करत राहणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या योजना देशासाठी मार्गदर्शन ठरतील अशा पद्धतीने राबवू, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांना दिला. आंतराष्ट्रीय धोरणकर्ते (इस्त्राईल सल्लागार दूत) डॅन अलुफ यांचेही मनोगत झाले. यावेळी प्रास्ताविकामध्ये राजेंद्र पवार यांनी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषिविज्ञान केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला.

घड्याळवाले माझे पार्टनर
चंद्रपूरच्या एका शेतकऱ्याने भाताच्या पिकावर प्रयोग करत एचएमटी वाणाची निर्मिती केली. एचएमटी हे नाव शेतकऱ्याला कसे सुचले, हे सांगताना त्यांनी त्या शेतकऱ्याच्या हातात असलेल्या घड्याळाचा दाखला दिला. घड्याळ चिन्ह आमचे असल्याचे शरद पवार तसेच अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुचित केले. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. हाच धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले सुप्रिया सुळे यांनी मला तुमचे घड्याळाचे दुकान आहे काय अशी विचारणा केली; पण मी त्यांना सांगितले माझे कसलेही घड्याळाचे दुकान नाही तर ‘घड्याळवालेच’ माझे पार्टनर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हशा पिकला.