Home ताज्या बातम्या राज्यात 20 जानेवारीपासून विविध ठिकाणी न्यायसहायक जागृती कार्यक्रम

राज्यात 20 जानेवारीपासून विविध ठिकाणी न्यायसहायक जागृती कार्यक्रम

0

मुंबई : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय येथे २१ व २२ जानेवारी रोजी न्यायसहायक जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर येथील लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे २० ते २४ जानेवारी २०२० या कालावधीत न्यायसहायक जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील विश्लेषणात्मक कार्याची माहिती प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, पोलीस तपास अधिकारी व अभियोग न्यायालयासंबंधी असलेल्या अभियोक्ता यांनी त्यांच्या प्रमुखांच्या पूर्वसंमतीने तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी घेत असलेल्या शिक्षणार्थींनी त्यांच्या महाविद्यालय किंवा विद्यापीठामार्फत पूर्वसंमतीने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्यासह नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर येथील लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे संपर्क साधावा.

समाजात घडणाऱ्या निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त नमुन्याचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषणाचे कार्य न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील प्रयोगशाळांमध्ये केले जाते. अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारांमध्ये गुन्हे करताना अत्याधुनिक सामुग्री व पध्दतींचा वापर होत आहे. या प्रवृत्तींना विफल करण्यासाठी दाखल झालेल्या मुद्देमालांवर रासायनिक विश्लेषण करुन सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून तपास यंत्रणांना आणि पर्यायाने न्यायदान यंत्रणेला महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करुन देण्याकामी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची महत्त्वाची भूमिका आहे.