Home ताज्या बातम्या पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागतो रस्ता

पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागतो रस्ता

0

पुणे : स्वारगेट येथील जेधे चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होते. तसेच, बेशिस्त वाहतूक, कुठेही उभ्या असणाऱ्या रिक्षांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. हा चौक कोंडीमुक्‍त करण्यासाठी बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्वारगेट हे शहरातील मुख्य वर्दळीचा भाग आहे. ‘पीएमपी’ डेपोसह एसटी स्थानकही असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो प्रवासी येथूनच पुणे शहरात प्रवेश करतात. तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. हे सर्व प्रवासी रिक्षा, बस किंवा खासगी वाहनांनी स्वारगेटला दाखल होतात. रिक्षा आणि पीएमपीने येणारे प्रवासी चौकात उतरतात. तसेच, बाहेरगावाहून येणारे प्रवासी रिक्षा किंवा अन्य साधनांसाठी स्थानकामधून चौकात येतात. या सर्व प्रवाशांना रस्ता ओलांडूनच जावे लागते. जेधे चौकातून हडपसरकडे जाण्यासाठी शंकरशेट रस्त्यावर नागरिक पायी जातात. तसेच, सिंहगड रस्ता परिसरात जाण्यासाठी नेहरू स्टेडियम पोलीस चौकीच्या दिशेला चालत जावे लागते. धनकवडी-कात्रजकडे जाणाऱ्यांसाठी एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबा आहे. या सर्वांना येथील कोंडीचा सामना करावा लागतो.

ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल असतानाही कोंडी


वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने जेधे चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाची योजना आखली. ही योजना पूर्ण होऊनही साधारणपणे पावणेतीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यानंतर काहीकाळ जेधे चौकातील आणि स्वारगेट परिसरातील वाहतूक कोंडी सुटली. सुरुवातीच्या काळात कोंडीमुक्‍त झालेला जेधे चौक आता पुन्हा वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे. बेशिस्तपणे चौकात थांबणाऱ्या रिक्षा, अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समुळे कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त रिक्षांवर कारवाई करण्यात येते.