Home ताज्या बातम्या कराडमधील अतिक्रमणांवर 3 फेब्रुवारीला कारवाई

कराडमधील अतिक्रमणांवर 3 फेब्रुवारीला कारवाई

0

कराड : कराड शहरात वाहतुकीची समस्या दिवसेदिवस गंभीर होत आहे. रिक्षाचालक व हॉकर्सच्या अतिक्रमणांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. या अतिक्रमणांवर 3 फेब्रुवारीला कारवाई करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

कराडमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या संदर्भात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कराड पालिका व विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीस नगराध्या रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, हणमंत पवार, विजय वाटेगावकर, विरोधी पक्षनेता सौरभ पाटील, स्मिता हुलवान, शहर वाहतूक शाखेचे सपोनि सतीश पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देसाई, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. ज्या रिक्षांना 16 वर्षे होऊन गेली आहेत, अशा रिक्षा उपप्रादेशिक परिवहन विभागाने भंगारात काढाव्यात.

त्यामुळे 30 ते 40 टक्‍के रिक्षा कमी होतील. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सातपुते यांनी दिल्या.
शहरातील महत्त्वाच्या पाच ठिकाणी वाहतूक समस्या गंभीर आहे. कोल्हापूर नाक्‍यावर एचडीएफसी बॅंकेसमोरील एसटीच्या थांब्याजवळ हॉकर्स व रिक्षाचालक रस्त्यावर वाहने उभी करून अतिक्रमण करतात. त्यांना नगरपालिकेने नोटीसा पाठवाव्या. अतिक्रमण करणाऱ्या हॉकर्सचे हातगाडे 3 फेब्रुवारीला हटवावेत.

ते त्यांना परत न देता ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. शाहू चौकात येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. तेथे अपघाताची शक्‍यता आहे. तेथे तात्पुरते अडथळे लावून अपघात न होण्याची खबरदारी घेतली जाईल. दत्त चौक ते चावडी चौक रस्त्यावर बाजारपेठ असून कायम वर्दळ असते. काही व्यापारी माल उतरवून घेण्यासाठी ट्रक, टेम्पो सायंकाळी उभे करून वाहतूक कोंडी करतात. त्या वाहनांवर कठोर कारवाई करावी. व्यापाऱ्यांनी आपला माल दुपारी 12 ते 3 या वेळेत उतरवून घ्यावा. कृष्णा नाका ते कॅनॉल या रस्त्यावरील पुलावर मोठे खड्डे पडल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू असते. पुलावर वाहन बंद पडल्यास ते बाजूला करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने क्रेनची सोय करावी.बसस्थानक परिसरात रिक्षा व हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. या परिसरात सात रिक्षा थांबे आहेत. त्यातील चार थांबे अधिकृत आहेत.

तेथील अनधिकृत थांबे तातडीने बंद करा, असे निर्देश सातपुते यांनी दिले. चार अधिकृत रिक्षा थांबे पर्यायी जागेत हलविण्यासंदर्भात नगरपालिका आणि पोलिसांनी चर्चा करावी, असेही त्यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी नगरपालिकेशी पत्रव्यवहार करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली होती. पालिकेने 125 कॅमेरे बसवण्यासाठी 59 लाख रुपयांची तरतूद केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

या कॅमेऱ्यांमुळे शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येईल. शहरातील रस्त्यावर काही ठिकाणी विजेचे खांब मध्ये आले आहेत. ते खांब बाजूला घेऊन वाहतुकीला होणारे अडथळा दूर करण्याबाबत महावितरणशी चर्चा सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील वाहतुकीबाबत आराखडा करावा, असे राजेंद्र यादव यांनी सुचविले. त्यावर तज्ज्ञांच्या सहकार्याने लवकरच आराखडा करण्यात येईल, असे सातपुते यांनी सांगितले.