Home गुन्हा विवस्त्र करुन लुटल्याचा बनाव करणार्‍या महिलेचे पितळ पडले उघडे

विवस्त्र करुन लुटल्याचा बनाव करणार्‍या महिलेचे पितळ पडले उघडे

0

जळगाव : सासर्‍यांनी ज्यांची मालमत्ता हडप केली, ती आहे त्या चुलत सासर्‍यांना मिळावी, या उद्देशाने विवस्त्र करुन मारहाण केली तसेच पाच लाखांचा ऐवज लुटून नेल्याचा बनाव पिडीत महिलेने स्वतःच केल्याचे पितळ स्थानिक गुन्हे शाखेने तपासात उघडे पाडले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी दुपारी चार वाजता शहरातील उच्चभ्रु वस्तीत घरात एकट्या असलेल्या उद्योजकाच्या पत्नीला दोन पुरुष व एक महिला अशा तिघांनी बेदम मारहाण करुन विवस्त्र केले व दोरीने बांधून ठेवत 5 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याचा गुन्हा रामानंद नगर पोलिसात 17 रोजी दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल करताना रोकड व दागिने असा पाच लाखाचा ऐवज लांबविण्यात आल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे पोलीस हा मुद्देमाल हस्तगत करणार आहेत. रात्री उशिरापर्यंत मुद्देमाल मिळालेला नव्हता.

कागदपत्रे फाडतांना महिला दिसली खबर्‍यांना

या घटनेबाबत महिलेने पोलिसांना सांगितलेली माहिती, त्यानंतर चौकशीच्यावेळी पोलिसांशी असलेली वर्तणूक, घटनेचे गांभीर्य या विषयी पोलिसांना संशयाची पाल चुकचुकली. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम व रामानंद नगर पोलिसांना कुठल्याही परिस्थितीत हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत तंबी दिली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे संजय हिवरकर व राजेश मेढे यांनी सलग तीन दिवस या कामात झोकून देत गुरुवारी त्यांना धागेदोरे मिळाले. जे कागदपत्र लुटून नेल्याचे महिलेने फिर्यादीत सांगितले होते, तेच कागदपत्रे जीन्याच्या खाली तर काही कागदपत्रे फाडताना ही महिला पोलिसांच्या खबर्‍याच्या नजरेस पडली. काही क्षणातच हिवरकर व मेढे यांनी महिलेचे घर गाठून कागदपत्रे ताब्यात घेतले.

चौकशीत नेमके प्रकरण आले समोर

स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून निरीक्षक बापू रोहोम, सहायक निरीक्षक नीता कायटे यांनीही महिलेची स्वतंत्ररित्या विश्वासात घेऊन चौकशी केली. कबुली दिल्यानंतर या महिलेची स्वत: पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनीही चौकशी केली. सासर्‍यांनी त्यांच्या लहान भावाची मालमत्ता हडप केली आहे व त्यांची पत्नी सतत घरी येवून याच विषयावर तगादा लावत होती. अधूनमधून शाप लागल्याचा विषय देखील चर्चेला येत होता, त्यामुळेच कि काय आपल्याला दहा वर्षापासून मुलबाळ होत नाही अशी धारणा झाली. यातून मार्ग काढलाच पाहिजे, त्यांची मालमत्ता त्यांना मिळायला हवी व आपलीही शापमधून मुक्तता होईल, या हेतूने बनाव केल्याचे महिलेने तपासात सांगितले.