Home ताज्या बातम्या पाटसमध्ये कडकडीत बंद

पाटसमध्ये कडकडीत बंद

0

वरवंड – पाटस (ता. दौंड) येथील हेमंत सोनवणे या मुलास पाटस टोलनाक्‍यावर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 23) पाटस गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजता निषेध सभा घेण्यात आली आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन गाव बंद मागे घेण्यात आला.

दौंड तालुक्‍यातील पाटस येथील हेमंत विश्‍वास सोनवणे या तरुणास मंगळवारी (दि. 21) पाटस टोलनाक्‍यावरील टोल व्यवस्थापक अजित सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात यवत पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी पाटस बंद ठेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. पाटस टोलनाका अधिकाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून, याबाबत गंभीर दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन मंगळवारी (दि. 21) पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते.

यावेळी पाटसचे सरपंच संभाजी खडके, उपसरपंच सायरबानू शेख, ग्रामपंचायत सदस्य कलावती मोहिते, तानाजी केकाण, सावळाराम वायाळ, डॉ. मधुकर आव्हाड, वसंत साळुंखे, मनोज फडतरे, दादासाहेब भंडलकर, संजय शिंदे, विश्‍वास अवचट यांसह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि महिला उपस्थित होते. यावेळी यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे, संतोष पंडित, संपत खबाले यांसह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात
आला होता.

स्थानिकांना टोल प्रशासनाच्या भूमिकेचा त्रास होत आहे, त्यामुळे एका महिन्यात टोल प्रशासनासोबत चार बैठका घेतल्या. बैठका अंतिम टप्प्यात येतात आणि टोल प्रशासनाचे लोक त्यास नकार देतात, ही आडमुठेपणाची भूमिका आहे. सर्व लोकभावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. रविवार (दि. 26) च्या आत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर लोकशाही मार्गाने या व्यवस्थेला विरोध करण्याचा नागरिकांचा प्रयत्न सुरू आहे, त्या प्रयत्नात येथील स्थानिकांसोबत राहणार आहे.

– राहुल कुल, आमदार, दौंड

स्थानिकांना टोलमधून वगळले पाहिजे. यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. स्थानिकांना मारहाण करणे हा अतिरेक झाला आहे, त्यामुळे पूर्णपणे लोकांच्या पाठीशी उभा राहणार आहे.

– रमेश थोरात, अध्यक्ष जिल्हा बॅंक, पुणे