Home गुन्हा “स्विगी’च्या डिलिव्हरी बॉयने केल्या चाळीस घरफोड्या

“स्विगी’च्या डिलिव्हरी बॉयने केल्या चाळीस घरफोड्या

0

सातारा : सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 40 घरफोड्या करणाऱ्या विजय सत्तापा ढोणे (रा. देगाव फाटा, सातारा, मूळ रा. बिदर, कर्नाटक) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे संशयित विजय ढोणे हा ‘स्विगी’ या कंपनीचा डिलिव्हरी बॉय आहे. त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल, ब्रॅंडेड घड्याळे, कृत्रिम दागिने, असा 20 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सातपुते यांनी दिलेली माहिती अशी, संशयित ढोणे हा ‘स्विगी’ कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून सातारा शहरात काम करतो. नागरिकांनी ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ घरपोच दिल्यावर त्या ठिकाणची ‘रेकी’ करायचा आणि संधी मिळताच घरफोड्या करायचा. अशा पध्दतीने त्याने सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 40 घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे.

आई आजारी असल्याचे कारण सांगत तो चोरलेले सोने सातारा शहरातील सराफांना विकत होता. तो मंगळवारी (दि. 21) चोरी करण्याच्या उद्देशाने तो सातारा शहरात फिरत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी संशयावरून त्याला हटकले. जऱ्हाड यांनी त्याची कसून चौकशी केल्यावर साताऱ्यात 40 घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून अधिक चौकशी केल्यावर सोने विकत घेणाऱ्या सराफांची माहिती दिली.

त्या माहितीच्या आधारे जऱ्हाड यांनी सराफांकडे चौकशी केली असता, आई आजारी असल्याचे सांगून संशयिताने सोने विकल्याचे सराफांनी सांगितले. पोलिसांनी संबंधित सराफांकडून सर्व सोने जप्त केले आहे. संशयिताने गुन्ह्यासाठी वापरलेल्या बनावट किल्ल्या, कटर, चाकू, लॅपटॉप, मोबाइल, ब्रॅंडेड घड्याळे, कृत्रिम दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत. संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहाय्यक फौजदार जोतिराम बर्गे, हवालदार तानाजी माने, कांतिलाल नवघणे, संतोष पवार, मुबिन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, नीलेश काटकर, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, विजय सावंत, अनू सणस, तनुजा शेख, ज्योती गोळे, प्रीती पोतेकर, नूतन बोडरे यांनी ही कारवाई केली.