Home ताज्या बातम्या 160 मिनीटांच्या भाषणानंतर अर्थमंत्री झाल्या अस्वस्थ

160 मिनीटांच्या भाषणानंतर अर्थमंत्री झाल्या अस्वस्थ

0

अर्थसंकल्पाचे भाषण घेतले आटोपते

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सुरवातीला तब्बल 160 मिनीटांचे भाषण केले. पण इतक्‍या प्रदीर्घ भाषणामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने अर्थसंकल्पाचा शेवटचा भाग न वाचताच त्यांना आपले भाषण अर्धवट सोडावे लागल्याचा प्रकार आज घडला. अर्थसंकल्पाची शेवटची दोन पाने वाचायची बाकी होती. त्याचवेळी त्यांच्या कपाळावर घाम आला. त्यावेळी त्यांच्या अन्य सहकारी मंत्र्यांनी त्यांना कॅंडी देऊ केल्या. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.त्यामुळे त्यांनी भाषण अर्ध्यावरच सोडून देणे पंसत केले.

कोणाही अर्थमंत्र्यांकडून इतके प्रदीर्घ अर्थ संकल्पीय भाषण आजवर झालेले नाही. या आधी जुलै 2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 तास 17 मिनीटांचे भाषण केले होते. त्यांचा त्यावेळचा विक्रमही त्यांनी आज मोडत तब्बल दोन तास चाळीस मिनीटांचे भाषण केले. अजूनही काही काळ त्यांचे भाषण चालले असते.

आज अर्थमंत्र्यांच्या भाषणामुळे राज्यसभेचे कामकात दीड वाजता सुरू होईल असे घोषित करण्यात आले होते. पण तरीही त्यावेळी त्यांचे लोकसभेतील भाषण सुरूच राहिल्याने राज्यसभेचे कामकाज भाषण पुर्ण होईपर्यंत तहकुब करण्यात आले. राज्यसभा दुपारी 1 वाजून 55 मिनीटांनी सुरू झाली पण तो पर्यंत अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी निर्मला सीतारमन राज्यसभा सभागृहात पोहचू शकल्या नव्हत्या त्यामुळे पुन्हा दहा मिनीटांसाठी कामकाज तहकुब करावे लागले. शेवटी त्या ज्यावेळी राज्यसभेत पोहचल्या त्यावेळी अनेक सदस्यांनी त्यांची विचारपुस करण्यासाठी त्यांच्या भोवती गर्दी केली. त्यांनी तेथे घाईगडबडीत अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी कामकाज सोमवार पर्यंत तहकुब केले.