Home ताज्या बातम्या नाशिक जिल्ह्यात ३५ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक ;१५ जणांचे वेतन रोखले

नाशिक जिल्ह्यात ३५ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक ;१५ जणांचे वेतन रोखले

0

 नाशिक : जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. मात्र. यातील १८ शिक्षक अल्पसंख्याक शाळांमध्ये कार्यरत असल्याने बचावले असून, अन्य दोन शिक्षक अनुकंपातत्त्वावर असल्याने त्यांचे वेतन नियमितपणे सुरू राहणार आहे, तर १५ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखण्यात आले आहे. 
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ मधील कलम २३ नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीईटी) राज्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी पहिली ते आठवीच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केलेले आहे. त्यासाठी राज्य सरकारने १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच २०१५ मध्ये केंद्र सरकारने टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी चार वर्षांची मुदतवाढ दिल्याने राज्य सरकारने दिलेली मुदतवाढ केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर करीत ३० मार्च २०१९ पर्यंत जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील टीईटी अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या वेतन पथकाने जानेवारी महिन्याचे वेतन काढण्यापूर्वी १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्ती झालेल्या सर्व शिक्षकांची माहिती मागविली होती. त्यातून जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये सुमारे ५० शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे समोर आले असून, १५ शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिलेल्या मुदतीत उत्तीर्ण केल्याचे स्पष्ट झाले, तर अन्य ३५ शिक्षक टीईटी अनुत्तीर्ण असतानाही सेवेत कार्यरत आहेत. यातील १८ शिक्षक हे अल्पसंख्याक शाळांमध्ये कार्यरत आहेत, तर अन्य दोन शिक्षक अनुकंपातत्त्वावर रुजू झाले आहेत. अशा शिक्षकांना  शासन निर्णयातून वगळले असल्याने त्यांचे वेतन कायम ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित १५ शिक्षकांचे वेतन रोखण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वेतन पथकाने दिली आहे. 

पडळताळणीत आढळलेली माहिती अशी 
एकूण नियुक्त शिक्षक -५०
टीईटी उत्तीर्ण शिक्षक -१५
अल्पसंख्याक शाळेतील शिक्षक -१८
अनुकंपातत्त्वावरील शिक्षक -०२
वेतन रोखण्यात आलेले शिक्षक-१५