Home ताज्या बातम्या येरवड्याच्या आधी देखील पुण्यात इंग्रजांनी बांधलं हाेतं एक कारागृह

येरवड्याच्या आधी देखील पुण्यात इंग्रजांनी बांधलं हाेतं एक कारागृह

0

पुणे :  इंग्रजांनी पुण्यातील येरवडा भागामध्ये 1871 साली कारागृह तयार केले. आशिया खंडातील सर्वात माेठे कारागृह म्हणून आपण येरवडा कारागृहाला ओळखताे. पाच हजाराहून अधिक कैदी सध्या या कारागृहामध्ये बंदिस्त आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का की येरवडा कारागृहाच्या आधी देखील एक कारागृह इंग्रजांनी पुण्याच्या मध्यवर्ती भागात तयार केले हाेते. पुण्यातील खडकमाळ या ठिकाणी हे कारागृह बांधण्यात आले हाेते. 

इंग्रजांनी जेव्हा देशभरात आपली पाळंमुळे राेवण्यास सुरुवात केली त्यानंतर क्रांतीकारकांना अटक करुन ठेवण्यासाठी त्यांनी देशभरात विविध ठिकाणी कारागृहांची निर्मिती केली. पुण्यातलं येरवडा कारागृह हे त्यातील सर्वात माेठे कारागृह म्हणून ओळखले जाते. परंतु त्या आधी देखील त्यांनी पुण्यात एक कारगृह तयार केले हाेते. ज्या ठिकाणी ते क्रांतीकारकांना डांबून ठेवत आणि त्यांना शिक्षा देत. हे पुण्यातील पहिले कारागृह हाेते. सध्याच्या मामलेदार कचेरीच्या भागात हे कारागृह अजूनही पाहायला मिळते. याच ठिकाणी क्रांतीकारी उमाजी नाईक यांना डांबून ठेवण्यात आले हाेते आणि खटला चालवून फाशी देण्यात आली हाेती. 

1857 च्या उठावाच्याआधी अनेक छाेटेमाेठे उठाव करण्यात आले हाेते. उमाजी नाईक यांनी इंग्रजांना तब्बल 14 वर्षे सळाे की पळाे करुन साेडले हाेते. अखेर 1832 साली इंग्रजांनी भाेर येथील एका गावात उमाजी नाईक यांना अटक केली. त्यांना अटक करुन खडकमाळ येथील याच पहिल्या कारागृहात ठेवण्यात आले. अडीच ते तीन महिने येथे त्यांच्यावर खटला चालला. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याच जेलच्या भागात असलेल्या एका अडाच्या ( विहीरीच्या ) वर लटकवून त्यांना 3 फेब्रुवारी 1832 राेजी फाशी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यासारखा क्रांतीकारक उठाव काेणी करु नये लाेकांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी पुढील तीन दिवस येथील पिंपळाच्या झाडाला त्यांचा मृतदेह लटकवून ठेवण्यात आला हाेता.