Home ताज्या बातम्या ‘त्यांना’ कधी होणार शिक्षा़ ?

‘त्यांना’ कधी होणार शिक्षा़ ?

0

नागपूर : देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या हिंगणघाट जळीतकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात करून नराधमाला लवकरात लवकर शिक्षा देण्याची घोषणा झाली आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणापासून तो नागपुरातील सानिका प्रकरणापर्यंत अनेकदा अशा घोषणा झाल्या आहेत. त्यातून उफाळलेल्या रोषाला तात्पुरता दिलासा मिळू शकतो. मात्र, एकतर्फी प्रेमातून निर्दोष तरुणींना निर्दयपणे संपविणाऱ्या अनेक क्रूरकर्म्यांचा निकाल अद्यापही लागलेला नाही. केसही बोर्डावर आलेली नाही. त्यामुळे ‘त्या’क्रूरकर्म्यांचा ‘निकाल’ कधी लागणार, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.
राज्यात यापूर्वी रिंकू पाटील, अमृता देशपांडे, दीपाली वानखेडे, नीता हेंद्रे, सानिका थूगावकर या तरुणी अशाच क्रौर्याच्या बळी ठरल्या. दिल्लीतील निर्भयाकांडाने देशभर संतापाची लाट उसळली होती. प्रत्येक वेळी उफाळून आलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी ‘या प्रकरणाचा’ तातडीने निकाल लावू, आरोपींना फासावर टांगू , अशी भाषा वापरण्यात येते. प्रत्यक्षात असे काहीही होत नाही. निर्भया प्रकरणातील क्रूरकर्मा अद्यापही कायदेशीर लाईफ लाईनचा वापर करून फासाला हुलकावणी देत आहेत. नागपुरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १८) या निरागस तरुणीच्या हत्येला आता १९ महिने झाले आहे. सर्वसाधारण परिवारातील सानिका टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिकायची. लक्ष्मीनगरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये तिचे मामा अविनाश पाटणे राहतात. त्यांच्या फायनान्स कार्यालयात ती काम करायची. रोहित हेमनानी(बोलानी) सोबत तिची मैत्री होती. मात्र, त्याचे विक्षिप्त वर्तन खटकत असल्याने तिने त्याच्यापासून स्वत:ला दूर करून घेतले होते. दरम्यान, मैत्रीला प्रेम मानत हेमनानी सानिकावर अधिकार गाजवू पाहत होता.
ती दाद देत नसल्याने त्याने तिला एकदा शेवटचे भेटायचे आहे, असे म्हणत १ जुलै २०१८ च्या रात्री ७.४५ च्या सुमारास हेमनानीने सानिकाला तिच्या मामाच्या कार्यालयात गाठले. ‘तू माझ्याशी संबंध का तोडले’ असा प्रश्न करीत त्याने तिच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे सपासप घाव घालून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले होते.
विशेष म्हणजे, हिंगणघाटमधील पीडित प्राध्यापिका ज्या रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत आहे, त्याच रुग्णालयात सानिकाने तब्बल महिनाभर मृत्यूशी झूंज दिली अन् अखेर नियतीपुढे हात टेकत प्राण सोडले. या घटनेमुळे नागपुरात त्यावेळी प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली होती. आरोपी हेमनानीला तातडीने कठोर शिक्षा करा, अशी संतप्त नागरिकांनी मागणी केली होती.
बजाजनगर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला तीन दिवसानंतर बडनेरा (अमरावती) स्थानकावर अटक केली होती. या थरारक गुन्ह्याला आता तब्बल १८ महिने झाले. आरोपीला शिक्षा होणे दूर ही केसदेखील अजून बोर्डावर आलेली नाही. आरोपी बिनभाड्याच्या खोलीत मोफतचे जेवण घेत आहे.

३० दिवसांत न्याय!
हिंगणघाटच्या जळीतकांडाने देशभर संतापाची लाट उसळली आहे. महिला-मुलींच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. त्या लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) हा खटला चालवून पीडित प्राध्यापिका आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायद्याचा अभ्यास करून या जळीतकांडातील क्रूरकर्म्याचा ३० दिवसांच्या आत कायदेशीर निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही म्हटले आहे. हीच घोषणा आणि हाच न्याय दिवंगत सानिकाच्या प्रकरणातही लागू होईल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.