0

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर ‘सीएमओ’ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी येणार आहे. सीएमओ कार्यालयाचे समन्वयक म्हणून शिवसेना आमदार वायकर यांची निवड करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांतच त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघणार आहे. 

युतीच्या मागील काळात रवींद्र वायकर हे राज्यमंत्री होते.  मात्र यावेळी त्यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. सुनील प्रभू आणि रवींद्र वायकर यांच्यापैकी कोणाला मंत्रीपदी यावरून पेच निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसेनेकडून दोघांनाही मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले होते. त्याची भरपाई आता शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

या पदाला मंत्रीपदाचा दर्जा देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांवरील कामाचा भार कमी होईल, तसेच वायकर यांचे पुनर्वसन होणार आहे. वायकर मातोश्रीच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमओच्या धर्तीवर राज्यात सीएमओचा पायंडा पाडला. मात्र पीएमओप्रमाणे सीएमओपदाला मंत्रीपदाचा दर्जा दिला नाही. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सीएमओला मंत्रीपदाचा दर्जा मिळणार आहे.