Home शहरे गोवा डिचोली, पेडण्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या: नरेश सावळ

डिचोली, पेडण्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या: नरेश सावळ

0

पणजी : डिचोली व पेडणो तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजुनही मिळालेली नाही. सरकारने त्याकडे लक्ष देऊन नुकसान भरपाईचा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी माजी आमदार व मगोपच्या कार्यकारी समितीचे कार्याध्यक्ष नरेश सावळ यांनी केली आहे.

डिचोली व पेडण्यातील शेतकऱ्यांचे काही महिन्यांपूर्वी मोठे नुकसान झाले. तिळारीचे पाणी अचानक सोडल्यानंतर आलेल्या पुराचा अनेकांना फटका बसला. मुळात तिळारीचे पाणी सोडले जाईल याविषयी लोकांत पुरेशी जागृती करण्यात सरकारची खाती अपयशी ठरली होती, असे सावळ म्हणाले. डिचोलीतील साळ, धुमासे, मेणकुरे व अन्य भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची हानी झाली. साळला टेकून असलेल्या पेडणो तालुक्यातील इब्रामपुरमधील शेतकऱ्यांनाही फटका बसला. केळी बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यात आल्याचा दावा सरकार करते पण साळ व इब्रामपुरमध्ये अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही.सरकारने अन्य ठिकाणचा वायफळ खर्च व उधळपट्टी कमी करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. भात पिकासह अन्य पिकाची नाशाडी झालेले शेतकरी अजुनही भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. एकाबाजूने रानडुक्कर व अन्य उपद्रवी प्राणी गरीब शेतकऱ्यांचे पीक नष्ट करतात व दुसऱ्याबाजूने सरकार भरपाई देखील लवकर देत नाही ही गोष्ट खेदजनक आहे. काही शेक:यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाल्यानंतर सरकार केवळ पाच हजारांची भरपाई देते हे देखील धक्कादायक आहे, असे सावळ म्हणाले. भात पीक घेणारे शेतकरी असो किंवा केळी बागायतीत काम करणारे शेतकरी असो, त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव सरकारने ठेवावी, असेही सावळ म्हणाले.