Home ताज्या बातम्या आधुनिक पीकपद्धतीने ६० गुंठ्यात घेतला नऊ लाखांचा कांदा

आधुनिक पीकपद्धतीने ६० गुंठ्यात घेतला नऊ लाखांचा कांदा

0

नरखेड : नरखेड येथील अनेक तरुण सैन्यात भरती झालेले…स्वत:ला सैन्यात जाण्याची  इच्छा…अनेक प्रयत्न केले…यश गवसत नव्हते…आता मार्गच बदलण्याचा निर्णय घेतला… निराश न होता आधुनिक पद्धतीने शेती केली.. ६० गुंठ्यात  ३०० पिशव्या अर्थात १५ टन माल घेतला. ९ लाख ५० हजारांच्या कांद्याचे उत्पन्न तीन महिन्यात घेण्याची किमया मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील एका तरुणाने साधली आहे.

मोहोळ तालुक्यातील  नरखेड येथील रणजित बिभीषण उबाळे असे त्या तरुणाचे नाव़ १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन सैन्यात भरती  होण्यासाठी दोन वर्षे प्रयत्न केले. सोबतीचे सवंगडी सैन्यात भरती झाले. स्वत:च्या प्रयत्नांना यश येत नसल्याने भरतीचा नाद सोडून पुणे येथील कुरकुंभ एम.आय.डी़सी. कंपनी गाठली.  तेथील पगार व खर्च परवडत नसल्याने त्यांनी गाव गाठले़ आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निश्चय केला़ आता शेती करायची तर पारंपरिक नव्हे तर आधुनिक पद्धतीने, नवीन प्रयोग करण्याचे ठरवले. 

आॅगस्टमध्ये ६० गुंठ्यात पंचगंगा या वाणाच्या रोपाची लागवड केली़ त्यात मशागत केली. रोपांची लागवड केल्यानंतर ७ ते ८ दिवसानंतर पाणी देऊन कॅबरेटाप, कर्जेट, नेटिओ, नुआन, पाँकल्याण या औषधांचे डोस दिले. पावसामुळे केवळ ४ ते ५ वेळाच  पाणी दिले़ पिकातून तीनवेळा खुरपणी केली़ डिसेंबरमध्ये विक्रीसाठी कांदा उपलब्ध झाला़ आवक कमी असल्याने प्रतिक्विंटल १० हजार ते १४ हजार रुपये दर मिळाला़ ६० गुंठ्यामध्ये  ९ लाख ५० हजारांचे विक्रमी उत्पादन मिळाले़ यासाठी ६० हजार रुपयांचा खर्च आला. 

३० गुंठ्यात उभारले शेततळे 
– उन्हाळ्यात पाणी टंचाई  भेडसावत होती़ पिके  कशी जगवायची असा प्रश्न होता़ अनेक अडचणींवर मात करुन ३० गुंठ्यामध्ये शेततळे उभारले़ हे पीक घेत असताना संघवी अ‍ॅग्रोचे गणेश इनामदार यांचे मार्गदर्शन लाभल्याचे उबाळेंनी सांगितले. नव्या कल्पना, प्रयोगांना प्रयत्नांची जोड दिली आणि आज  ९ लाखांचे उत्पन्न मिळाले़ 

देशात हरितक्रांती होऊन आपण पीकपद्धत  बदललेली नाही़ पारंपरिक पद्धतीने पीक घेत असल्याने फारसे उत्पन्न मिळत नाही़ आता पीक पद्धत घेण्याची पद्धतच बदलली आहे़ आधुनिक पद्धतीने शेतीकडे वळालो आणि सैन्यात जाण्याचा जो आनंद होता तो पीक लागवडीतून घेतोय़ आधुनिकता स्वीकारली की जीवनातील नैराश्यही दूर होते याचा अनुभव घेतोय़ 
– रणजित उबाळे
 कांदा उत्पादक, नरखेड