Home गुन्हा लेंगरे येथे भरदिवसा पावणेदोन लाखाचे दागिने लंपास : विटा पोलिसांत तक्रार

लेंगरे येथे भरदिवसा पावणेदोन लाखाचे दागिने लंपास : विटा पोलिसांत तक्रार

0

विटा : घरातील लोक जेवण करीत असताना, बेडरूममधील कपाटातून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ८० हजार रूपये किमतीचे ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना खानापूर तालुक्यातील लेंगरे (बोबडेवाडी) येथे मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. भरदुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी राजेंद्र पंडितराव देशमुख (रा. बोबडेवाडी-लेंगरे) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

लेंगरे येथील राजेंद्र देशमुख हे बोबडेवाडी येथे कुटुंबीयांसह राहतात. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता पत्नी, आई, भावजय व मुलगी आणि ते स्वत: असे सर्वजण घराच्या पुढील बाजूस असलेल्या हॉलमध्ये एकत्रित जेवण करीत होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या दुसऱ्या बेडरूमचा दरवाजा उघडा होता.

जेवण झाल्यानंतर त्यांची भावजय स्वाती या दुसºया बेडरूममध्ये गेल्या असता, त्यांना कपाट उघडे असल्याचे दिसून आले. तसेच कपाटातील साहित्यही अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी घरातील अन्य लोकांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी बेडरूमध्ये जाऊन पाहिले असता, चोरट्यांनी कपाटातील ५० हजार रूपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ, एक लाख रूपये किमतीची पाच तोळे वजनाची सोन्याची तीनपदरी मोठी माळ, २० हजार रूपये किमतीचे एक तोळा वजनाचे कानातील वेल, तसेच १० हजार रूपये किमतीच्या अर्धा तोळा वजनाच्या एक खड्याच्या कुड्या, असे सुमारे १ लाख ८० हजार रूपये किमतीचे ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी राजेंद्र देशमुख यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली असून हवालदार मोहन चव्हाण पुढील तपास करीत आहेत.