Home ताज्या बातम्या ‘बजरंगबलीच्या कृपेनं जिंकलात, आता शाळा-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा’

‘बजरंगबलीच्या कृपेनं जिंकलात, आता शाळा-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा’

0

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने (आप) मोठा विजय मिळविला आहे. या विजयानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. 

विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांसह भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनीही अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी हनुमानजींनी दिल्लीवर कृपा केली आहे, असे म्हटले होते. यावरून कैलाश विजयवर्गीय यांनी अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील शाळा आणि मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकविण्याचा सल्ला दिला आहे.

कैलाश विजयवर्गीय यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, अरविंद केजरीवाल यांचे विजयाबद्दल अभिनंदन. निश्चितच जे हनुमानाला शरण येतात, त्यांना आशीर्वाद मिळतो. दिल्लीतील सर्व शाळा, मदरसा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हनुमान चालिसा शिकविण्याची आता वेळ आली आहे.” याबरोबर, त्यांनी लिहिले आहे की, “बजरंगबलीच्या कृपेने आता दिल्लीवासियांची मुलं वंचित का राहतील?”

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निवडणुकीत दिल्लीकरांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला एकहाती सत्ता दिली आहे.  आपने विधानसभेच्या 70 पैकी 62 जागांवर विजय मिळविला. तर भाजपाला फक्त आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला या निवडणुकीतही भोपळाही फोडता आलेला नाही.