उस्मानाबाद ,प्रतिनिधी : भारत सरकारच्या महत्वाकांक्षी ‘स्टॅन्ड अप इंडिया’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी पुणे स्टेशन जवळ अल्पबचत सांस्कृतिक भवन मध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ‘स्वावलंबन संकल्प अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सिडबी, एससी एसटी हब आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( डिक्की ) च्या वतीने देशात ठिकठिकाणी ३० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘स्टॅन्ड अप इंडिया’ योजनेच्या माध्यमातून देशात अनुसूचित जाती – जमाती मधून एक लाख पंचवीस हजार नवीन उद्योजक निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिद्ष्ट होते. त्यापैकी मागील तीन वर्षात २० हजार उद्योजक निर्माण झाले आहेत व बँकांनी ३,३८४ कोटी रुपयांचे विनातारण कर्ज दिले आहे.
‘स्टॅन्ड अप इंडिया’ योजनेची मुदत २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काळात देशात एक लाख पाच हजार नवीन उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिद्ष्ट आहे. त्यासाठी सिडबी, एससी एसटी हब, भारत सरकारचे सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी उद्योगाच्या सहाय्याने डिक्कीने कार्ययोजना बनविली आहे. ती अनुसूचित जाती व जमातीच्या होतकरू तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशव्यापी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात होतकरू तरुण तरुणींना विविध व्यवसायांच्या संधीबद्दल मार्गदर्शन, भारत सरकारच्या विविध सार्वजनिक उपक्रमांचे सादरीकरण होईल. आयडीया गॅलरी ही उपलब्ध असेल. व्यवसाय सुरु करण्यासाठी लाभ घेता येईल.
दरम्यान कार्यक्रमास डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे उपस्थित राहणार आहेत. इच्छुक तरुण तरुणींनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती डिक्कीचे मराठवाडा अध्यक्ष प्रफुल्ल पंडित, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष शीतलकुमार शिंदे यांनी केले आहे.