Home गुन्हा तहसीलची भिंत पाडून ट्रक पळविण्याचा प्रयत्न

तहसीलची भिंत पाडून ट्रक पळविण्याचा प्रयत्न

0

तासगाव : वाळू तस्करीप्रकरणी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी कारवाई करून ताब्यात घेतलेला ट्रक गुरुवारी रात्री वाळू तस्करांनी पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंदाज न आल्याने तो ट्रक तहसील कार्यालयाच्या भिंतीला धडकल्याने भिंत कोसळली. या अयशस्वी प्रकारानंतर संबंधितांनी धूम ठोकली.

याप्रकरणी ट्रक मालक नीलेश ऊर्फ चिक्या नरसू फाकडे (रा. फाकडे गल्ली, हरिपूर, ता. मिरज) व वाहन चालक सोमनाथ बाळू लोहार (रा. कुपवाड) या दोघांवर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

तहसीलदार कल्पना ढवळे यांना सोमवारी नागाव-निमणी येथील पाचवा मैल – सांगली मार्गावर विनापरवाना वाळू वाहतूक करीत असलेला ट्रक (क्र. एमएच ४३ यु ९४४९) आढळून आला होता. हा ट्रक नागाव व ढवळी येथील तलाठ्यांनी तहसील कार्यालयात उभा केला होता.

गुरुवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या दरम्यान नीलेश फाकडे व बाळू लोहार यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून हा ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक पाठीमागे घेत असताना तहसील कार्यालयाच्या समोरील कंपाऊंड भिंतीवर धडकून भिंत कोसळली.

या प्रकाराने घाबरलेल्या दोघांनी ट्रकमधून उड्या टाकत धूम ठोकली. याप्रकरणी शासकीय खनिजाची चोरी करून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद तहसील कार्यालयातील सुरक्षा रक्षक सतीश उपाध्ये यांनी दिली आहे.