Home शहरे अहमदनगर शिक्षकांसंदर्भात केलेल्या ‘त्या’ विधानावरून इंदुरीकर महाराज पुन्हा वादात

शिक्षकांसंदर्भात केलेल्या ‘त्या’ विधानावरून इंदुरीकर महाराज पुन्हा वादात

0

अहमदनगर: सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतात. अनेकदा ते समाज प्रबोधन करताना अनेक ज्वलंत विषयांनाही हात घालतात. त्यांच्या खास विनोदी व हजरजबाबी शैलीमुळं ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. त्यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंदुरीकर महाराज यांनी शिक्षक शाळेत कसा वेळ वाया घालवतात यावर बोट ठेवलं आहे. त्यांची ती क्लिप वाऱ्यासारखी पसरली आहे.

34 मिनिटांच्या तासिकेत शिक्षक हे पाच मिनिटं वर्गात प्रवेश करण्यासाठीच घेतात. वर्गात गेल्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटं आणि आदल्या दिवशी काय झालं ते सांगायला पाच मिनिटं घेतात. हे सगळं झाल्यावर उद्याच्या तासाला काय शिकवणार हे सांगायलाही पाच मिनिटं घेतात. मग तास संपला हे सांगायची वेळ येते, असा त्यांचा क्रम सुरूच असतो. त्यांच्या या ‘शिकवणी’मुळं शिक्षक संघटना संतापल्या आहेत.

ओझर येथील एका कीर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात विधान केलं होतं. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली होती. आता शिक्षकांसंदर्भात केलेल्या विधानावरून ते कोंडीत सापडले आहेत. कठीण गोष्टी कीर्तनातून सांगण्यासाठी कीर्तनकारांकडून अनेकदा जीवनातील उदाहरणं समोर ठेवली  जातात. मात्र ते करत असताना किमान भान बाळगणं गरजेचं आहे. एखाद्याची शोभा होणार नाही याची काळजी संबंधितांनी घ्यायला हवी, शिक्षकांबद्दल बोलताना ते स्वत: एक शिक्षक आहेत हे त्यांनी विसरू नये. त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलिन करू नये,’ अशी भूमिका शिक्षणतज्ज्ञांनी मांडली आहे.