मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे द्वितीय ज्येष्ठ न्यायाधीश न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक, कौटुंबिक कारणास्तव आपल्याला महाराष्ट्राबाहेर जायचे नाही. त्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली असली तरी आपल्याला वैयक्तिक, कौटुंबिक कारणामुळे मुंबई सोडायची नाही, असे न्या. धर्माधिकारी यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
अॅड. मॅथ्यू नेदुम्बरा यांनी शुक्रवारी एका याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात घेण्याची विनंती न्या. धर्माधिकारी यांना केली. त्या वेळी ‘मी आॅफिस सोडले आहे. आज माझा कामकाजाचा शेवटचा दिवस आहे,’ असे त्यांनी कोर्ट रूममध्ये सांगितले.
‘सुरुवातीला मला ही मस्करी वाटली. ते ज्येष्ठ न्यायाधीश आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याने मला धक्का बसला,’ अशी प्रतिक्रिया नेदुम्बरा यांनी दिली. १४ नोव्हेंबर २००३ रोजी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळणार होती. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे गुरुवारी संध्याकाळी त्यांनी राजीनामा पाठवला. मात्र, अद्याप तो स्वीकारण्यात आला आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.