Home ताज्या बातम्या दुचाकीच्या धडकेने वानर कोमात, दुचाकीस्वार पळाला

दुचाकीच्या धडकेने वानर कोमात, दुचाकीस्वार पळाला

0

.कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप गावाच्या फाट्यावर अज्ञात दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या वानराला जोरदार धडक दिली. या अपघातात वानराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, ते कोमात गेले आहे.

रहिमतपूर-औंध रस्त्यांवरील साप फाटा येथून गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वानर रस्ता ओलांडत असताना वेगात आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने वानराला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे वानर काही अंतरावर जाऊन कोसळले आणि बेशुद्ध झाले. या अपघातामध्ये वानराच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन रक्त वाहू लागले.

यावेळी रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक व आजूबाजूला असलेल्या स्थानिक नागरिकांनी जखमी वानराला रहिमतपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रहिमतपूरचे वनपाल संदीप जोशी व वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याकडे धाव घेतली.

पशुवैद्यकीय अधिकारी उमेश मस्के यांनी जखमी वानराची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. तसेच गंभीर दुखापत झाल्याने वानर कोमात गेले असून, अधिक उपचारासाठी पुणे येथे घेऊन जाण्यास सांगितले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जखमी वानराला रहिमतपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात देखरेखीखाली ठेवले आहे.

वानरावर कात्रज, पुणे येथे उपचार होणार

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या वानराला शुक्रवारी दुपारी कात्रज (पुणे) येथील प्राण्यांच्या अनाथ आश्रमात नेऊन अधिक उपचार केले जाणार आहेत. वानराला धडक देऊन पळून गेलेल्या दुचाकीस्वाराचा तपास केला जात असल्याची माहिती रहिमतपूरचे वनपाल संदीप जोशी यांनी दिली.