Home ताज्या बातम्या इंदुरीकर महाराज म्हणतात; ‘कीर्तन सोडून शेती करेन; खूप मनःस्ताप झाला!’

इंदुरीकर महाराज म्हणतात; ‘कीर्तन सोडून शेती करेन; खूप मनःस्ताप झाला!’

0

संगमनेरः कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मत व्यक्त करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकारानंतर इंदुरीकर महाराज उद्विग्न झाले आहेत. दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे काही बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे, असा खुलासाही इंदुरीकर महाराजांनी केला आहे. 

वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,’ अशी भावनाच इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकाराचे इंदुरीकर महाराजांनी यू ट्युबवाले आणि कॅमेरावाल्यांवर खापर फोडले आहे. ‘यू ट्युबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकरला संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला नको त्या प्रकरणात गुंतवण्याचा आटापिटा सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयाप्रत आलेलो आहे. आता लय झालं. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कॅपॅसिटी संपलेली आहे,’ असं त्यांनी सांगताच उपस्थित अवाक् झाले.

26 वर्षे झाली. मला बायको नाही. पोरगं नाही. रात्रं-दिवस प्रवास, कष्ट, कष्ट, कष्ट, कष्ट लोकांसाठी करतोय. दोन-अडीच तासाच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी हे भागवत, ज्ञानेश्वरीतही सांगितलंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेवून द्या पहिलं. तीन दिवसांत अर्धा किलोनं वजन घटलं. यू ट्युबवाल्यांना इंदुरीकराच्या नावानं मोक्कार पैसा मिळाला. मी काय या यू ट्युबचा एक रुपयाही घेतला नाही. ही यू ट्युबवाली मंडळी झाली कोट्यधीश. प्रत्येक व्हिडिओला एक एक लाख लाइक आहेत. पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय. पाहणाऱ्यांची संख्या खूप असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

ओझर येथील एका कीर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात विधान केलं होतं. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली होती. आता शिक्षकांसंदर्भात केलेल्या विधानावरून ते कोंडीत सापडले आहेत. कठीण गोष्टी कीर्तनातून सांगण्यासाठी कीर्तनकारांकडून अनेकदा जीवनातील उदाहरणं समोर ठेवली  जातात. मात्र ते करत असताना किमान भान बाळगणं गरजेचं आहे. एखाद्याची शोभा होणार नाही याची काळजी संबंधितांनी घ्यायला हवी, शिक्षकांबद्दल बोलताना ते स्वत: एक शिक्षक आहेत हे त्यांनी विसरू नये. त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलिन करू नये,’ अशी भूमिका शिक्षणतज्ज्ञांनी मांडली आहे.