Home शहरे अहमदनगर सोयरीक ठरविण्याकरिता वधू-वर मंडळांकडून लूट

सोयरीक ठरविण्याकरिता वधू-वर मंडळांकडून लूट

0

नेवासा | प्रतिनिधी:- मुलींनी तिशी आणि मुलांची पस्तिशी ओलांडली तरी, अनुरूप स्थळे मिळत नसल्याने याचा फायदा नोंदणीकृत नसलेल्या वधू वर सूचक मंडळ यांनी उठवला आहे. लग्न ठरल्याबद्दल स्थळांची आज ती परिस्थिती असेल त्याप्रमाणे देणगीची मागणी केली जात असल्याचे समजते आहे.
सध्या विविध क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलींची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिक्षणामुळे अगोदरच पंचविशी ओलांडली आहे. त्यांना जोडीदारही त्याच तोलामोलाचा असावा, असे वाटते. मुलाला शेती पाहिजे, पण तो शेतकरी नको. यामुळे अनेक ३२ ते ३५ वयोगटातील शेतकरी मुलांचे लग्न ठरेना असे झाले आहे. पुर्वी ग्रामीण भागातील जेष्ठ मंडळी काही स्थळे सुचवत होती.परंतु आता त्यांची ही संख्या कमी झाल्याने अशी स्थळे शोधणेही बंद झाली आहे. त्यामुळे सोयरीक जमविण्याच्या नावाखाली नोंदणीकृत नसणारे वधु-वर सूचक मंडळाचे पेव फुटले. त्यांच्याकडून स्थळ असेल त्याप्रमाणे वधू-वर मंडळाच्या संस्थेला देणगीची मागणी केली जात असते. अनुरुप स्थळे मिळत नसल्याने वधू वर पित्यांना या सोयरीक मंडळाच्या व वधु-वर सुचक मंडळाच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. नोंदणीकृत नसलेल्या वधू -वर सूचक मंडळाकडून आर्थिक लुटीचे प्रकार सध्या जोमात सुरू आहेत.
किमान पदवीधर आणि त्याहीपुढे शिक्षण झालेल्या मुली तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलींना तर मुलगा शहरातील असावा, कुटुंब लहान असावे, शेत जमीन हवीच, पण नोकरी मात्र सरकारी पाहिजे. खाजगी पॅकेज असेल, तेही काही लाखात असावे, आशा अपेक्षा आहेत. एक तर विवाह मुहूर्त कमी आणि वधू-वरांच्या समर्पक अपेक्षांची पूर्तता करायची याचा फायदा उठवत सोयरीक जुळवण्याच्या माध्यमातून वधु वर सूचक केंद्र पोळी भाजुन घेताना दिसत आहे
लग्न ठरण्यासाठी अशीही शक्कल
ग्रामीण भागातील अनेक मुलांना जमिनी चांगल्या आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न ही लाखो रुपयांच्या पटीत आहे. परंतु मुलींना मुलगा शेतकरी नको आहे. त्यामुळे परिसरातील कारखाना, हॉस्पिटल, मोठ्या संस्थेत किमान लग्न होईपर्यंत तरी नोकरी आणि पगाराची स्लिप मिळावी यासाठी यासाठी वर पित्यांना संस्थाचालकांचे उंबरठे जावे लागत आहे.
मुलींच्या अपेक्षा वाढल्याने वधू-वर मंडळच पर्याय
उस्थळ दुमाला (ता. नेवासा) येथील वर पित्याने सांगितले, मुलगा शेती करत असल्याने लग्न ठरताना अडचणी येत आहेत. मुलींच्या अपेक्षा वाढल्याने जे स्थळ पाहिले, तेथे निराशाच पदरी पडत होती.शेवटी सोयरीक जमवण्यासाठी वधु वर सुचक केंद्र कडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु त्यांच्याकडूनही अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी होत आहे. अलीकडे सोयरीक जमविण्यासाठी वधू- वर सूचक मंडळाचे पेव फुटले आहे. ऑनलाइन, ऑफलाइन विवाह जुळविण्याचे कामे करणाऱ्या अशा सोयरीक,व वधु-वर मंडळांची संख्या वाढत आहे. स्थळे सुचवण्यासाठी आणि लग्न जमवताना वधू वरांच्या पित्याकडून मोठी आर्थिक मागणी होत आहे.

□सोयरीक जमविण्यासाठी वधू – वर सूचक मंडळाकडून विवाह ठरवताना वधू-वरांच्या पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी राजमाता जिजाऊ मराठा वधु-वर मंडळा च्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारीपासून वधू वरांसाठी मोफत नोंदणी अभियान सुरू केले आहे. संपूर्ण राज्यातून २१५० विवाह इच्छुक मुला-मुलींची नोंद झाली आहे, अशी माहिती संपर्क अभियान समितीचे प्रमुख जयकिसन वाघ पाटील (मोबाईल नंबर ९१३०९५०९९९)यांनी दिली
ते म्हणाले, सध्या अनाधिकृत वधु-वर सूचक मंडळाचे अक्षरशः पेव फुटले आहे. फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत.यालाच आळा घालण्यासाठी जिजाऊ प्रतिष्ठान अहमदनगर यांनी यात पुढाकार घेतला आहे.प्राथमिक टप्प्यात मराठा समाजाला यामध्ये समाविष्ट केले आहे.