Home ताज्या बातम्या डॉक्टरांच्या कमतरतेमुळे १०८ रुग्णवाहिकाच सलाईनवर

डॉक्टरांच्या कमतरतेमुळे १०८ रुग्णवाहिकाच सलाईनवर

0

अत्यवस्थ रुग्णांची हेळसांड

उस्मानाबाद , प्रतिनिधी : दिनांक १७ अत्यवस्थ रुग्णांना तात्काळ आणि अत्यावश्यक रुग्णसेवा उपल्बध व्हावी म्हणून शासनाने १०८ रुग्ण सेवा चालू केली आहे. मात्र या रुग्णवाहिकेवर सध्या आवश्यक प्रमाणात वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नाहीत. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील ही १०८ रुग्णवाहिका सेवा मागील चार पाच महिन्या पासून विस्कळीत झाली असून अत्यवस्थ रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सन २०१४ पासून शासनाने एका नामांकित कंपनीची १०८ ही सुसज्ज रुग्णवाहिका चालू केली आहे. या रुग्णवाहिकेवर तीन वैद्यकिय अधिकारी आणि दोन चालकांची सेवा चोवीस तासांसाठी असते. या रुग्णवाहिकेत रुग्णाला दाखल केल्याबरोबर लगेच रुग्णावर उपचार सुरू केले जातात. यामुळे अत्यवस्थ रुग्णाला वेळेत उपचार मिळाल्याने रुग्णासाठी ही सेवा जीवन दाईनी ठरली आहे. मात्र मागील चार पाच महिन्या पासून या रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी सेवा सोडून गेल्याने ही १०८ रुग्णवाहिका सेवा विस्कळीत झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिका सेवा ७ मे २०१४ रोजी सुरू करण्यात आली. जिल्ह्यात पंधरा सुसज्ज रुग्णवाहिका आहेत. पैकी अकरा रुग्णवाहिका बेसिक लाईफ सपोर्ट आणि चार रुग्णवाहिका अडव्हान्स लाईफ सपोर्ट प्रकारच्या आहेत. अडव्हान्स प्रकारच्या रुग्णवाहिकेत कार्डीयाक मॉनिटर, व्हेंटिलेटर, सिरीज पंप आणि इनफुजनपंप या चार मशिन्स अधिक आहेत. उर्वरित सुविधा आणि औषधे दोन्ही प्रकारच्या रुग्णवाहिकेत सारखीच आहेत. उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात एक, तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एक, लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयात एक आणि जळकोट (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक अडव्हान्स प्रकारची रुग्णवाहिका आहे. उर्वरित बेसिक प्रकारच्या अकरा रुगणवाहिका येडशी, अणदूर, येरमाळा, भूम, बेंबळी, उमरगा, ढोकी, मुरूम, वाशी, परांडा आणि कळंब येथील दवाखान्यात आहेत.

या रुग्णवाहिकेवर प्रत्येकी तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र एकूण पंचेचाळीस पैकी फक्त पंचविसच वैद्यकीय अधिकारी सध्या सेवेत आहेत. उर्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवेतून काढता पाय घेतला आहे. यामुळे चांगली असलेली एक सेवा विस्कळीत झाल्याने अत्यवस्थ रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान ही सेवा देणाऱ्या खाजगी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक डॉ. प्रकाश शेलार यांनी अन्य सेवेतील भरतीसाठी अनेक डॉक्टरांनी रुग्णवाहिकेवरील सेवा सोडल्याचे मान्य करत या सेवेसाठी लवकरच वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करून ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.