नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना 3 मार्चला फासावर लटकविण्यात येणार आहे. यासंबंधीचे डेथ वॉरंट दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टाने सोमवारी जारी केले आहे.
निर्भयाच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी पटियाला हाउस कोर्टात सुनावणी झाली. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार, या चारही दोषींना येत्या 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार आहे. सरकारी वकिलांनी सांगितले की, अक्षय, विनय आणि मुकेश या दोषींची दया याचिका कोर्टाने फेटाळून लावली. तसेच, याप्रकरणी दोषी पवन नवी दया याचिका आणि क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करू शकतो. हायकोर्टाने दोषींना सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करण्याचा अल्टिमेटम दिला होता, परंतु या कालावधीत दोषी पवनच्यावतीने कोणतीही याचिका दाखल केली गेली नव्हती.
यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंटमध्ये 22 जानेवारी रोजी दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 1 फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, कोर्टाने 31जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबविली होती. कोर्टाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे.
16 सप्टेंबर 2012 रोजी दिल्लीत एका अल्पवयीन मुलासह सहा जणांनी चालत्या बसमध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिला बसमधून बाहेर टाकण्यात आले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेच्या निषेधार्थ देशाच्या विविध भागांमध्ये आंदोलने झाली. समाजाच्या सर्वच स्तरांमधून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणातील चार दोषींना (विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी राम सिंहने 2015 मध्ये तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तर एका अल्पवयीन आरोपीने तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. 2015मध्ये त्याची सुटका करण्यात आली.