Home ताज्या बातम्या उद्यापासून 12 वीची परीक्षा; विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्याचे शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे आवाहन

उद्यापासून 12 वीची परीक्षा; विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्याचे शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे आवाहन

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) उद्यापासून सुरु होत आहेत. माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनों बारावीची परीक्षा महत्त्वाची असल्याने ही परीक्षा तणावमुक्त द्या, अशा आवाहन वजा शुभेच्छा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या.

बारावीची परीक्षा पुढील करिअर निवडण्यासाठी खूप महत्त्वाची असते. पण या परीक्षेचा कोणताही ताण न घेता परीक्षेला सामोरे जा. परीक्षा कालावधीत तुम्ही जितके प्रसन्न रहाल, हसतमुख असाल आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न कराल, तितकी तुमची परीक्षेतील कामगिरी चांगली होईल. परीक्षेचे दडपण घेतले तर केलेला अभ्यासही आठवत नाही, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळेच परीक्षांच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा.

विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन करताना प्रा. गायकवाड यांनी म्हटले आहे की, तुमची मुलं तणावमुक्त वातावरणात परीक्षा कसे देतील यावर लक्ष द्या. परीक्षांच्या दिवसांमध्ये मुलांना सारखे अभ्यासाबद्दल विचारून त्याचा तणाव वाढवू नये. उलट वातावरण हलके फुलके ठेवून ताण दूर करण्याचा प्रयत्न करावा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. बारावी परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 027 विद्यार्थी बसणार आहेत. यापैकी 8 लाख 43 हजार 552 विदयार्थी आहेत तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थीनी आहेत. 9 हजार 923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली असून परीक्षेसाठी राज्यात 3 हजार 36 परीक्षा केंद्र असणार आहेत.

राज्यात या परीक्षेच्या कालावधीत कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळात विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना पेपरपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना नकारात्मक विचार अथवा परीक्षेची भीती, मानसिक दडपण येते. त्यासाठी विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळात समुपदेशन करण्यासा 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळाकडून राज्यात एकूण 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी कळविले आहे.