गोव्यातील ड्रग्स व्यवहाराची भयानक स्थिती पुन्हा एकदा समोर

- Advertisement -

पणजी :  गोव्यात समाज माध्यमांवर गांजाच्या नशेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, गोव्यातील ड्रग्स व्यवहाराची भयानक परिस्थीती पुन्हा एकदा समोर आली आहे. या महाभंयकर संकटाचा सामना करण्यासाठी लोकांनी पुढे येण्याची व ड्रग्सरुपी भस्मासुराचा वध करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

कामत म्हणतात की, सरकार राज्यात ड्रग्स व्यवसाय अस्तित्वातच नसल्याचा दावा करून गुप्तचर संस्था व पोलीस यांच्या अकार्यक्षमतेवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करीत आहे. ड्रग्सच्या राक्षसाने आता संपूर्ण गोव्याला विळखा घातला आहे. प्रत्येक नागरिकाने या राक्षसाचा वध करण्यासाठी पुढे सरसावणे काळाची गरज ठरली आहे. 

सरकार ड्रग्सच्या बाबतीत आपण काहीतरी करीत असल्याचा आव आणत आहे. परंतु, ड्रग्स पुरविणाऱ्यांपर्यंत सरकारचे हात पोचत नाहीत, ही दुर्देवाची बाब आहे. या व्यवहाराच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करणे हे महत्वाचे असल्याचे कामत म्हणतात.

सरकारने गोव्यातील सर्व शाळा, काॅलेज तसेच शैक्षणिक संस्थांवर काटेकोरपणे नजर ठेवणे गरजेचे आहे. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व पालक यानी महत्वाची भूमिका बजावावी लागेल. तरच या महाभंयकर संकटाचा बिमोड शक्य होणार आहे. भावी पिढी या व्यसनाच्या आहारी जाण्यापूर्वीच सर्वांना जागे होऊन या संकटाचा सामना करावा लागेल, असे कामत म्हणतात.

एक दिवस आपलीच मुले या व्यसनाच्या आहारी गेल्याचे आपणाला कळेल हे सरकारी अधिकारी व पोलिसांनी लक्षात ठेवावे व वेळीच शहाणे होऊन या समस्येचा बिमोड करावा. आतातरी सरकारने संवेदनशीलता दाखवून पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -