Home गुन्हा घरातून बेपत्ता झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

घरातून बेपत्ता झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

0

जळगाव : दोन दिवसापूर्वी घरातून बाहेर गेलेल्या कोमल हिरामण सोनवणे (१५, रा.कांचन नगर, जळगाव) या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी आसोदा रेल्वे गेट जवळ रुळापासून ९ मीटर अंतरावर झुडपाला लागून आढळून आला. मृतदेहाची अवस्था व शरीरावरील जखमा पाहता संशय व्यक्त होत आहे. ही घटना रेल्वे अपघात दाखविण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा होती. कोमल ही नंदीनीबाई वामनराव बेंडाळे मुलींच्या विद्यालयात दहावीच्या वर्गात होती.
तिच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल ही शनिवारी पहाटे घराच्या बाहेर पडली. ते सकाळी उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. दिवसभर शोध घेतल्यानंतर कुठेही ती आढळली नाही किंवा माहिती न मिळाल्याने सायंकाळी शनी पेठ पोलिसात तक्रार देण्यात आली. तिथे अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजता आसोदा रेल्वे गेटचे गेटमन सिनकलाल दुबे यांना रेल्वे रुळापासून किमान ९ ते १० मीटर अंतरावर झुडपाशेजारी या तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर शनी पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर कोमलचे वडील हिरामण सोनवणे यांनी घटनास्थळ गाठले. आपलीच मुलगी असल्याचे पाहून त्यांनी जागेवरच हंबरडा फोडला.
दोन्ही पाय फ्रॅक्चर
कोमल हिचा उजवा हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर असून नाकातून रक्तस्त्राव झालेला आहे. शरीरावर ओरखडल्याचे व्रण आहे. जीन्स पॅँट व टी शर्ट परिधान केलेला होता. उजव्या पायाचे तर हाडेच बाहेर आलेली आहेत. छातीला व पोटालाही जखमी झालेल्या आहेत. त्यामुळे कोमल ही रेल्वेतून पडली की रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला किंवा आणखी काही वेगळा प्रकार आहे, याची पोलीस चौकशी करीत आहेत.
दहावीच्या परिक्षेचा ताण
कोमल हिचे वडील हिरामण सोनवणे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे चार वाजता ती घरातून गेली. गेल्या काही दिवसापासून दहावीच्या परिक्षेत कसं होईल, काय होईल, असे ती सांगत होती. तिच्या चेहऱ्यावर परिक्षेचा तणाव दिसत होता, त्यामुळे त्यातूनच ती घराच्या बाहेर पडली.
वडील होमगार्ड व रिक्षा चालक
कोमल हिचे वडील होमगार्ड असून उर्वरित वेळेत ते रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. आई मंगला गृहीणी आहे. मोठी बहीण सोनी पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहेत.
भाऊ प्रिन्स व यशराज देखील शिक्षण घेत आहेत. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळीच कोमलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुन्हा शवविच्छेदनाला विलंब
गेल्या आठवड्यात पिंप्राळा येथील बालिकेच्या शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने या बालिकेचा मृतदेह धुळे येथे नेण्याची वेळ आली होती, सोमवारी पुन्हा कोमलच्या शवविच्छेदनासाठी फॉरेन्सिकचे डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाले नाहीत. सकाळी १० वाजता आलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन सायंकाळी साडे पाच वाजता झाले. वैद्यकिय अधीक्षक डॉ.किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.आकाश चौधरी, डॉ.मिलिंद चौधरी, डॉ.मिलिंद पवार, डॉ.संदीप पाटील व डॉ.शितल पाटील यांच्या समितीने हे शवविच्छेदन केले.
मृतदेहाच्या शरीरावरील काही व्रण पाहता थोडासा संशय आहे. चौकशी व व्हिसेरा अहवालात मृत्यूचे कारण, किती तासापूर्वी मृत्यू झाला हे स्पष्ट होईल, त्यानंतरच पुढील कारवाई करता येईल. प्राथमिक स्तरावर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. -विठ्ठल ससे, पोलीस निरीक्षक, शनी पेठ
कोमल हिच्या हातापायाचे हाडे तुटले आहेत तर पोटात व छातीत मार लागल्याने रक्तस्त्राव निर्माण झाला होता. त्यामुळेच मुलीचा मृत्यू झालेला आहे, मात्र आणखी काही गोष्टींसाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. -डॉ.किरण पाटील, वैद्यकिय अधीक्षक, शासकिय
वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय