Home बातम्या आंतरराष्ट्रीय अमेरिका भारताला देणार ‘4G’ सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!

अमेरिका भारताला देणार ‘4G’ सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!

0

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. ज्यात तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी एकसुरात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला लगाम घालणं आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि दोन्ही देशांमधील मजबूत झालेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे. भारताचा हा अभूतपूर्व दौराही कधी विसरणार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच त्यांनी भारतीयांनी केलेल्या शानदार स्वागतासाठी आभारही व्यक्त केले आहेत. 

तीन अब्ज डॉलरचा संरक्षण करार
भारत आणि अमेरिकेदरम्यान तीन अब्ज डॉलर (21559350000000 रुपये)च्या संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ज्यात अमेरिकेचे 23 एमएच 60 रोमियो हेलिकॉप्टर आणि सहा एएच 64ई अपाचे हेलिकॉप्टरचा समावेश आहे. संयुक्त विधानात ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांमध्ये संरक्षण संबंध आणखी मजबूत होणार आहेत. अमेरिकेकडून घेण्यात येणारे दोन्ही प्रकारची ही हेलिकॉप्टर्स कोणत्याही मोसमात शत्रूवर हल्ला करण्यात सक्षम आहेत. चौथ्या पिढीचं हे हेलिकॉप्टर समुद्रातील पाणबुडीलाही अचूक लक्ष्य करून तिचा नेस्तनाबूत करू शकते.  

लवकरच ट्रेड डीलवर होणार चर्चा- मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्या वाणिज्य मंत्र्यांनी व्यापारसंबंधी सकारात्मक चर्चा केली आहे. आम्ही दोघांनीही ठरवलं आहे की, आपापल्या देशांच्या टीमनं या व्यापार चर्चेला अंतिम स्वरूप द्यावं. आम्ही एका मोठ्या व्यापार करारावरही चर्चा करण्यास सहमत आहोत. जागतिक स्तरावर आमचे संबंध समान लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत.  

पाकिस्तानला सुनावले खडे बोल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दहशतवादाचा उल्लेख करत म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि मी आपापल्या देशातील नागरिकांना कट्टर दहशतवादापासून वाचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. अमेरिका पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला प्रतिबंध घालण्यासाठी पाऊल उचलणार आहे. दोन्ही देशांचं दहशतवादाविरोधात लढाई लढण्यावर एकमत झालं आहे. त्यानंतर मोदी म्हणाले, दहशतवादाचं समर्थन करणाऱ्यांना जबाबदार धरण्यासाठी आम्ही आणखी दृढ प्रयत्न करणार आहोत. आज आमच्यामध्ये ड्रग्ज तस्करी, नार्को-दहशतवाद आणि संघटित गुन्ह्यांसारख्या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यावर सहमती झाली आहे.