Home ताज्या बातम्या तीन महिने जतन केलेल्या सापाच्या अंड्यातून पाच पिल्ले बाहेर

तीन महिने जतन केलेल्या सापाच्या अंड्यातून पाच पिल्ले बाहेर

0

सोलापूर : तीन महिन्यांपूर्वी बाळे येथे तस्कर या बिनविषारी सापाची सात अंडे आढळली. सर्पमित्रांनी शास्त्रीय पद्धतीने या अंड्यांची तब्बल तीन महिने काळजी घेतली. त्यांच्या या कष्टाला यश आले असून, अंड्यांमधून आता पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सातपैकी पाच अंड्यांमधून पिल्ले बाहेर आली आहेत, अशी माहिती नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे पप्पू जमादार यांनी दिली.

बाळे येथील खडक गल्लीमध्ये १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता एक तस्कर जातीचा साप जाताना तेथील रहिवासी कासीम पठाण यांना दिसला. त्यांनी याची माहिती संतोष धाकपाडे यांना दिली. काही वेळातच धाकपाडे तेथे पोहोचले. त्यांनी एका कपाटाखाली लपलेल्या सापाला पकडून बरणीमध्ये बंद केले. काही वेळानंतर त्या सापाला सोडण्यासाठी म्हणून बरणी उघडली. त्यावेळी त्या मादी सापाने बरणीत चक्क सात अंडी घातली होती. अंडी ठेवण्यासाठी सुरक्षित जागा शोधत असताना तेथील लोकांनी त्या सापाला पाहिले होते. यानंतर सर्पमित्रांनी सापाला नैसर्गिक आवासात सोडून दिले.

फक्त सापांच्या काही जाती अशा आहेत की जी अंडी दिल्यानंतर त्यातून पिल्लं बाहेर येईपर्यंत त्याची निगा राखतात.
बाकीचे साप अंडी घातल्यानंतर ती अंडी सोडून निघून जातात. या तस्कर सापाची अंडी खराब होऊ नये म्हणून संतोष धाकपाडे यांनी नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा आणि डॉ. प्रतीक तलवाड यांच्याशी संपर्क साधून त्या अंड्याची निगा कशी राखायची याचे मार्गदर्शन घेतले.

अशी घेतली अंड्यांची काळजी

  • सापांची अंडी रबरासारखी मऊ कवचाची व लांबट असतात. त्यांना योग्य तापमानासोबत योग्य आर्द्रता द्यावी लागते. एका मोठ्या बरणीत वाळू, खडी आणि फरशीचे तुकडे व तसेच अर्धा ग्लासभर पाणी टाकून योग्य तापमान तयार केले. त्यात अंडी ठेवली. अंडी मिळालेल्या दिवसापासून ११५ दिवसांत सात अंड्यांपैकी पाच अंड्यातून पाच पिल्लांचा जन्म झाला. ही सापाची पिल्ले साधारण १० ते १२ इंच लांबीची आहेत. लहानपणापासूनच छोटी पाल, उंदीर, कीटक यांची शिकार करून निसर्गात राहू शकतात.

सापाच्या मोजक्या काही जाती सोडल्या तर त्यांना उबविण्याची गरज नसते. बाळे येथे सापडलेल्या सापाच्या अंड्यांना उबविण्याची गरज नव्हती, मात्र त्यांना विशिष्ट वातावरणाची गरज असते. अंड्यांना बुरशी लागू नये, गरजेपुरती हवा मिळणे महत्त्वाचे होते. अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर २४ ते ४८ तासात ते पहिल्यांदा कात टाकतात. जन्मानंतर पहिल्या आठवड्यात ते काही खात देखील नाहीत. या सर्व पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक आवासात आम्ही सोडणार आहेत.

  • डॉ. प्रतीक तलवाड