Home ताज्या बातम्या ठाणेकरांना मिळणार शेतकरी ते ग्राहक असा थेट भाजीपाला

ठाणेकरांना मिळणार शेतकरी ते ग्राहक असा थेट भाजीपाला

ठाणे: सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थीतीत दैनंदिन भाजीपाला घेण्यासाठी नागरिक दररोज बाजारपेठांमध्ये गर्दी करीत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनही पाळला जात नसल्याचे ‍चित्र बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. नागरिकांची गैरसोय होवू नये व बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना थेट भाजीपाला त्यांच्या इमारतीपर्यत उपलब्ध करुन दिला जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापौर नरेश म्हस्के यांच्या सहकायाने ठाण्यातील मी मराठी प्रतिष्ठान  व क्रक्स रिस्क मॅनेजमेंट प्रा.लि यांच्या माध्यमातून ठाणेकरांना शेतातील भाजी वाजवी दरात उपलब्ध होणार आहे.

            आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापौर दालनात या  शेतकरी ते ग्राहक असा थेट भाजीपाला या बेवसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले आदी ‍ उपस्थीत होते. या उपक्रमासाठी मी मराठी प्रतिष्ठान  व क्रक्स रिस्क मॅनेजमेंट प्रा.लि चे डॉ. राजेंद्र पाटील व श्री विरेंद्र पाल या द्वयींनी यासाठी पुढाकार घेतला आहे. www.mmdcare.in  या वेबसाईटवर किंवा 9987736103 या व्हॉटसॲप क्रमांकावर नागरिकांनी आपल्याला हव्या असलेला भाजीपाला व फळे यांची मागणी ऑनलाईन नोंदविल्यानंतर पैसेही ऑनलाईन भरता येणार आहेत किंवा ऑर्डर आल्यानंतर पैसे देण्याची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांनी मागणी करताना कमीत कमी 300 रुपयापासून अधिकची मागणी नोंदवावी.  मागणी  नोंदविल्यापासून पुढच्या 48 तासात त्या ग्राहकाला भाजीपाला व फळे  उपलब्ध होणार आहेत.

            या उपक्रमातून प्रत्येक ऑर्डरमागे 10 रुपयांचा निधी हा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला जाणार असून यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क  मोजावे लागणार नाही. त्यामुळे यातून सामाजिक सेवा देखील होणार असून ग्राहकांना सर्व त-हेची काळजी घेवून उच्च प्रतीचा भाजीपाला व फळे मिळणार आहेत. या कामासाठी जे काम करणार आहेत, त्यांच्या  स्वच्छतेची काळजी तसेच त्यांना मास्क, हॅण्‌डग्लोज आदी सुरक्षेची उपकरणे उपलबध करुन दिली आहेत. या उपक्रमात जर प्रत्येक इमारतीतून 10 पेक्षा अधिक मागणी असल्यास ते पोहचविणे शक्य होईल व ऑर्डर देताना  सोशल डिस्टान्स देखील पाळले जाईल असेही डॉ. राजेंद्र पाटील यांनी नमूद केले. अधिक माहितीसाठी डॉ. राजेंद्र पाटील 9420787197 व  विरेंद्र पाल 9820399044 या क्रमांकावर संपर्क साधावा.

    सध्याची परिस्थीती पाहता, ठाणेकरांनी घरी बसूनच आपल्याला लागणारा भाजीपाला व फळे मागवावीत, जेणेकरुन बाहेर पडण्याची गरज भासणार नसून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.