Home ताज्या बातम्या कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाधित क्षेत्रातील ५ कारागृहे लॉकडाऊन – गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाधित क्षेत्रातील ५ कारागृहे लॉकडाऊन – गृहमंत्री अनिल देशमुख

0

मुंबई: कारागृहात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात येत आहेत.

संबंधित कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

कारागृहात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. ज्यायोगे त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण होईल, असेही कळविण्यात आले आहे.

संबंधित कारागृहांना या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.