Home ताज्या बातम्या कोरोनाला आपण सर्व मिळून हरवू या-आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला निर्धार

कोरोनाला आपण सर्व मिळून हरवू या-आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला निर्धार

0

विक्रमी वेळेत कोरोना रुग्णालय कार्यान्वित

पुणे दि.१२: कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासन,आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून या कोरोनाच्या विषाणूचा संपूर्ण बिमोड करून या भयंकर विषाणूला सर्व मिळून हरवण्याचा निर्धार विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसकर यांनी व्यक्त केला.
उद्या दि.१३ एप्रिलपासून ससून रुग्णालयात खास कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटल सुरू होत आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम,जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बी जे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे,कार्यकारी अभियंता तेलंग तसेच बांधकाम विभागाचे अभियंता आणि ससूनचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.


ससून कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभाग,बाह्यरुग्ण विभाग,ऑक्सिजन प्लांट,आयसोलेशन वॉर्ड यांची पहाणी करून आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी अत्यावश्यक सूचना केल्या ,ते म्हणाले, कोरोनाचा पुण्यातील वाढता प्रादुर्भाव रोखणे व रुग्णांना आवश्यक उपचारासाठी अल्पावधीत झालेले हे देशातील पहिले कोविड रुग्णालय ठरेल. प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे शक्य झाले.
जिल्हाधिकारी राम म्हणाले,देशात मोठे रुग्णालय म्हणून ससूनची ओळख आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा असलेले कोविड रुग्णालय आवश्यक होते.याकरिता ससून रुग्णालय परिसरातील अकरा मजली अपूर्ण अवस्थेतील इमारतीचा कोविड उपचारासाठी कसा वापर करता येईल, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले. आपत्ती व्यवस्थापन निधीतून , वैद्यकीय उपकरणे , रुग्णालयासाठी आवश्यक सामग्री घेण्यात आली.त्यामुळे विक्रमी वेळेत हे रुग्णालय सुसज्ज झाले आहे.ते पुढे म्हणाले, या रुग्णालयासाठी 13 हजार लिटर क्षमता असलेला ऑक्सिजन प्लान्टमधून 20 अतिदक्षता वॉर्ड तसेच सर्व मजल्यांवर ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य आहे.300 टन वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचे काम अवघ्या 5 दिवसात झाले.या रुग्णालयातील खास प्रशिक्षित डॉक्टर्स,स्टाफ व येथील अत्याधुनिक व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांमुळे कोरोनाच्या बाधित रुग्णांवर वेळेत व दर्जेदार उपचार होतील.
यावेळी अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांनी वैद्यकीय उपचार,सुविधा यांची माहिती देऊन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी केलेल्या नियोजन ,मार्गदर्शनामुळे आणि बांधकाम विभागाच्या अथक प्रयत्नातून अतिशय कमी वेळेत हे रुग्णालय तयार झाले असून येथे करोना बधितांसाठी वेळेत व अत्यावश्यक उपचार केले जातील,असे सांगितले.