Home ताज्या बातम्या कोव्हिड – 19 तपासणी करीता स्वॅब सॅम्पल घेताना काचेच्या केबिनचे सुरक्षा कवच

कोव्हिड – 19 तपासणी करीता स्वॅब सॅम्पल घेताना काचेच्या केबिनचे सुरक्षा कवच

0

कोरोनाचा विषाणू हा संसर्गातून पसरणारा असल्याने दैनंदिन जीवनात नियमित काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यातही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अथवा कोरोना संबंधित लक्षणे आढळणा-या व्यक्तींचे स्वॅब सँपल घेताना अधिक दक्षता घेण्याची गरज लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साऊथ कोरियाच्या धर्तीवर 3 बाय 3 फूट आकाराच्या केबिनच्या स्वरुपात कोव्हिड – 19 स्वॅब सॅंपल कलेक्शन सेंटर तयार केले आहे. याव्दारे एकप्रकारे स्वॅब सँपल घेणा-या वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी यांना कोव्हिड – 19 चे सुरक्षा कवच लाभलेले आहे.

      वाशी येथील डेडिकेटेड कोव्हिड – 19 रुग्णालय याठिकाणी 2 तसेच ऐरोली व नेरूळ सार्वजनिक रुग्णालय आणि बेलापूर येथील माता बाल रुग्णालय याठिकाणी 1 अशी एकूण 5 कोव्हिड – 19 स्वॅब सॅंपल कलेक्शन सेंटर तयार करण्यात आली असून त्याव्दारे सुरक्षितरित्या स्वॅब कलेक्शन करण्यात येत आहे.      ही स्वॅब कलेक्शन सेंटर म्हणजे 3 बाय 3 फूट आकाराची केबीन असून त्याला पुढील बाजुने समोरील माणूस दिसू शकेल अशाप्रकारे काचेचे आवरण लावण्यात आलेले आहे. या काचेला 2 हॅंडग्लोव्हज जोडण्यात आले असून स्वॅब कलेक्शन करणारी व्यक्ती या केबिनमध्ये जाऊन केबिन बाहेरील व्यक्तीचे हँडग्लोव्हजव्दारे सुरक्षितरित्या स्वॅब सँपल घेऊ शकते. यामुळे या दोघांचा परस्पर संपर्क टाळला जावून संभाव्य संसर्ग टाळला जातो. या काचेच्या केबिनमुळे सँपल घेणा-या वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी यांना एक प्रकारचे सुरक्षा कवच लाभलेले असून त्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना दूर झाली आहे.