कोल्हापूर : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र तरीही राज्यातील रुग्णांमध्ये वाढ आटोक्यात आलेली नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही वाढ होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 50 वर्षांवरील एकूण साडे अकरा लाख लोकांची तपासणी केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज कोल्हापूर जिल्हयातील वयाने जेष्ठ आणि व्याधीग्रस्त व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येईल. अशा व्यक्तींची एकूण संख्या अंदाजे 11 लाख इतकी आहे. या व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी मोबाईलवर आधारित “आयुष” नावाने एक अॅप विकसीत करण्यात येत आहे. ते येत्या दोन-तीन दिवसात कार्यान्वित केले जाईल. त्यापूर्वी जिल्हयातील काही भागात असे सर्वेक्षण प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येईल आणि नागरिकांचे समुपदेशन करण्यात येईल.
जिल्ह्यातील 50 वर्षापेक्षा जास्त असलेल्या आणि विविध व्याधीग्रस्त नागरिकांमध्ये कोविड-19 विषाणू प्रतिबंधक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि उपाय योजना सुचविण्याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुष समिती स्थापन केली. या समितीने उपाय योजनांबाबत येत्या दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सद्यस्थितीत उपलब्ध वैद्यकीय निरिक्षणाप्रमाणे कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी शरीरात रोग प्रतिकार शक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि विविध व्याधिग्रत नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या बाबतीत वेळीच खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्हयामध्ये 50 वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार, दमा, क्षय रोग तसेच इतर श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोविड 19 विषाणू प्रतिबंधक प्रतिकारशक्ती आणि सर्वसाधारण रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी उपाययाजना हाती घेण्यात आल्या आहेत.
यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळी यांच्या अध्यक्षतेखाली आयुष समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून जनरल पॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी पार्टे, होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मोहन गुणे, जिल्हा परिषदेच्या आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत रेवडेकर, महानगरपालिका आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी डॉ.पुनम वळंजू, डॉ. नाळे यांचा समावेश आहे.
या समितीने जिल्हयातील 50 वर्षापेक्षा जास्त वय त्याचप्रमाणे व्याधीग्रस्त रुग्णांमध्ये सर्वसाधारण रोग प्रतिकारकशक्ती वाढवून अशा व्यक्ती कोरोना विषाणू संसर्गाने बाधीत होणार नाहीत यासाठी कोणकोणत्या उपाय योजना आवश्यक आहेत, यावर वैद्यकीयदृष्टया अभ्यास करावा. तसेच याबाबत केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालय त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडील विविध मार्गदर्शक सूचनांचा साकल्याने अभ्यास करुन हाती घ्यावयाच्या उपाययोजना सुचवाव्यात, असं सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या आहेत.
समितीने सुचवलेल्या उपाययोजना
- संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींचे समुपदेशन
- निर्धारीत गटांच्या सर्व व्यक्तींचे आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मार्फत मोबाईल आधारीत “आयुष” अॅपव्दारे सर्व्हेक्षण
- सर्व्हेक्षणातील सर्व नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत समुपदेशन. परिपूर्ण माहिती पत्रकही देणार
- सर्व्हेक्षणातील सर्व नागरिकांना समितीने सुचविलेल्या रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे साधने देणार
- सर्व्हेक्षणातील सर्व व्यक्तींच्या आरोग्याचा आढावा आणि समुपदेशन