Home ताज्या बातम्या बारामती पोलिसांच्या बरोबर माजी सैनिक सुद्धा कोरोनाच्या लढाईत

बारामती पोलिसांच्या बरोबर माजी सैनिक सुद्धा कोरोनाच्या लढाईत

0

बारामती: लॉकडाऊन च्या काळात पोलिसांबरोबर खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवक, आरोग्य सेवक, शासनाच्या सूचनेनुसार जनतेची सेवा करीत आहेत.आता या लढाईमध्ये बारामती पोलिसांच्या बरोबर माजी सैनिक सुद्धा कोरोनाच्या लढाईत उतरले आहेत. बारामती शहर आणि तालुका पोलीस स्टेशनला आता 42 माजी सैनिक कार्यरत होणार आहेत. पोलिसांबरोबर पडेल ते काम यामध्ये केले जाणार आहे.बंदोबस्त करणे, चेक पोस्ट, नेमून दिलेल्या ठिकाणी नागरिकांना मदत करणे, आदी कामे हे माजी सैनिक करणार आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी हे माजी सैनिक मोफत पार पाडणार आहेत.
सैनिक म्हणून सीमेवर काम करत असताना निवृत्त झाल्यानंतर सुद्धा देशसेवेसाठी हे सैनिक आता पुढे सरसावले आहेत. बारामती शहर आणि तालुक्यामध्ये विविध ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली जात आहे.यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती नगरपरिषद च्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आदी च्या मागर्दर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यावेळी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब घोलप, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. व्ही शेंडगे आणि बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर आणि 42 माजी सैनिक याप्रसंगी उपस्थित होते.सीमेवरचे लढाई शत्रु बरोबर केल्या आहेत, आता डोळ्यास न दिसणाऱ्या या शत्रू बरोबर लढाई करत असताना पोलिसांबरोबर काम करून आणि एक प्रकारे देश सेवा करत आहोत.

यापेक्षा कोणतेही पदक आमच्यासाठी महत्त्वपूर्ण नाही आहे असे आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी याप्रसंगी सांगितले.

कोरोनाचे भीषण संकट देशावर आले आहे. या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण देश लोकडाऊन करण्यात आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी बारामती येथील माजी सैनिक संघटनेने देखील पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ प्रसंगी पोलिसांच्या बरोबर माजी सैनिक देखील कोरोनाचा सामना करण्यासाठी रस्त्यावर उतरतील असे माजी सैनिक राजेंद्र चव्हाण यांनी प्रभातशी बोलताना स्पष्ट केले.