Home ताज्या बातम्या वाधवान कुटुंबियांचा आज क्वॉरन्टाईन पीरियड दुपारी संपणार, सीबीआयने ताब्यात घेऊन चौकशी करावी

वाधवान कुटुंबियांचा आज क्वॉरन्टाईन पीरियड दुपारी संपणार, सीबीआयने ताब्यात घेऊन चौकशी करावी

0

मुंबई : बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांचा आज क्वॉरन्टाईन पीरियड दुपारी दोन वाजता संपत आहे. तर राज्य सरकारकडून ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांचा ताबा घेण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आज अनिल देशमुख यांनी फेसबुक लाइव द्वारे संवाद साधला.

ते म्हणाले की, गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीमुळे वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं. या वाधवाना कुटुंबाचा क्वॉरन्टाईन पीरियड आज दुपारी दोन वाजता संपत आहे. पोलीस दलातर्फे ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. आपण त्यांना आपल्या ताब्यात घ्यावं ही विनंती केली आहे. आज दुपारी दोनपर्यंत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना घेऊन जावं. जोपर्यंत सीबीआयचे अधिकारी त्यांना घेऊन जात नाहीत तोपर्यंत हे वाधवान कुटुंब आमच्याच ताब्यात राहिल.

तसेच मधल्या काळात काही जण लंडनला पळाले, पण महाराष्ट्र सरकार वाधवान कुटुंबाला कुठेही पळू देणार नाही. ते आमच्या ताब्यात आहेत. त्यानंतर आम्ही पुढील तपासासाठी त्यांना सीबीआयच्या ताब्यात देऊ. सध्या वाधवान यांना गेल्या 15 दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वॉरन्टाईन केलं आहे. दुपारी दोनची वेळ संपल्यानंतर सीबीआयने त्यांना आपल्या ताब्यात घेऊन पुढील चौकशीचं काम करावं, अशी विनंती करण्यात आली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. महत्त्वाचं म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतलं नव्हतं. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका असल्याने सीबीआयने अख्ख्या कुटुंबाला क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता.