Home शहरे पुणे पिरंगुट मध्ये संघ स्वयंसेवक सरसावले प्रशासनाच्या मदतीला

पिरंगुट मध्ये संघ स्वयंसेवक सरसावले प्रशासनाच्या मदतीला

गुरुवार दिनांक ३० एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका मा. तहसीलदारांनी तालुक्यात अडकलेल्या अन्य जिल्हयातील / प्रांतातील नागरिकांना त्या त्या गावातील तलाठी कार्यालयात नावनोंदणी करण्याचे आवाहन केले. सामाजिक माध्यमातून हा संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यावर उद्योगनगरी पिरंगुट येथे नागरिक/कामगार/मजूर वर्ग मोठ्या संख्येने ग्रामपंचायतसमोर जमा व्हायला सुरुवात झाली. सर्व नावे तहसीलदारांकडे त्याच दिवशी सायं ४ पर्यन्त पोचवणे अपेक्षित असल्याने अक्षरश: हजारो नागरिकांनी आपली नाव नोंदणी करायला सुरुवात केली. सर्व नावे एक्सल स्वरूपात पाठवणे अपेक्षित होते आणि ग्रामपंचायतकडे केवळ एकच कर्मचारी यासाठी उपलब्ध होता. ही अडचण ओळखून ग्रामपंचायत सदस्यांनी संघ स्वयंसेवक यात मदत करतील का अशी विचारणा केली.

हा निरोप आल्यावर पुढील अर्ध्या तासात आठ दहा स्वयंसेवक लॅपटॉप घेऊन ग्राम सचिवालयात आले आणि संगणकावर नोंदणी करायला सुरुवात केली. जवळपास ५ हजारहुन जास्त कामगार वर्गाने नोंदणी केली असल्यामुळे एका दिवसात काम पूर्ण होणे अशक्य होते. मा. तहसीलदारांनी याला पुन्हा एक दिवस मुदतवाढ दिल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनी – १ मे रोजी काम सुरू ठेवायचे असे ठरले.

रात्री पुन्हा अन्य स्वयंसेवकांपर्यन्त निरोप दिले गेले. शुक्रवारी, महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा १५ स्वयंसेवक ग्राम सचिवालयात सकाळी १०:३० वाजताच उपस्थित राहिले आणि कामाला सुरुवात केली. आयटी कंपनीतील वॉर रूम शोभेल असे ग्राम सचिवालयाला स्वरूप आले होते. सोबत ५ स्वयंसेवकांनी घरूनच संगणकावर माहिती भरण्याचे काम केले. दोन दिवसात एकूण मिळून ७८२४ एवढ्या नागरिकांची नोंदणी स्वयंसेवकांनी केली आणि एक्सेल फाईल मा. तलाठी अधिकाऱ्यांकडे जमा केली.

तातडीने स्वयंसेवकांची केलेली उपलब्धता तसेच दोन दिवस काम करून सर्व नोंदणी पूर्ण केल्यामुळे पिरंगुटचे तलाठी, पोलीस पाटील, सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य या सर्वांनीच स्वयंसेवकांचे कौतुक केले आणि आभार मानले