Home गुन्हा कोरोना पसरवल्याचा आरोप,मुंबईत महिला हवालदाराच्या पतीविरोधात पोलीस कारवाई

कोरोना पसरवल्याचा आरोप,मुंबईत महिला हवालदाराच्या पतीविरोधात पोलीस कारवाई

मुंबई: कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आहे. यातही धारावी ते मलबार हिल पट्ट्यात रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. पण या सगळ्याचे भान न ठेवता मनमानी करणारे काही महाभाग आहेत. अशा मंडळींविरोघात पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत एका महिला पोलीस हवालदाराच्या पतीविरोधातही पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसाचा नवरा आहे आपल्याला कोण जाब विचारणार अशी मग्रुरीत वावरणाऱ्याला पोलिसांनीच भानावर आणलं आहे.

सध्या सगळीकडे कोरोनाची चर्चा आहे. पण आपल्याला काही होणार नाही आणि पत्नी पोलिसांत आहे म्हणजे कोणीही जाब विचारणार नाही, अशी समजूत करुन घेऊन एका ३० वर्षीय तरुणानं उद्दामपणा केला. अनेक दिवसांपासून डेंजर झोनमध्ये असलेल्या मुंबईतून हे महाशय थेट साताऱ्यात गेले. हा प्रकार कळताच सातारा पालिकेनं या ‘मुंबईच्या पाव्हण्याला’ गाठला. गावभर हिंडू नका गुमानं घरात एका खोलीत बसा, होम क्वारंटाईन व्हा. ते जमत नसल्यास इथल्या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये चला असं पाव्हण्याला सांगितलं. पाव्हण्यानं घरातच होम क्वारंटाईन व्हायचं कबूल केलं. पण पठ्ठ्या तिथे थांबलाच नाही. गुपचूप घराबाहेर पडला आणि मुंबईची वाट धरली. ‘मुंबईचा पाव्हणा’ गायब झाल्याचं कळताच सातारकरांनी थेट मुंबईत अलर्ट धाडला.

मुंबईत पोलीस सावध झाले. महाशय मजल दरमजल करुन गुपचूप दादरच्या नायगाव परिसरातील बीडीडी चाळीतल्या घरात येऊन विसावले होते, तोच पोलीस पथक विचारपूस करायला हजर झालं. “काय मंडळी बरं आहे नं. असायलाच पाहिजे…” असं म्हणत, महिला पोलीस हवालदाराच्या पतीविरोधात कारवाई केली. कोरोना पसरवल्याप्रकरणी पोलीस कारवाई करण्यात आली. हलगर्जीपणा करुन आजार पसरवल्याप्रकरणी भादंवि कलम २६९ आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती निवारण कायदा कलम ५१ (१) ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पती महाशयांना थेट संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये पाठवून देण्यात आलं.

कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून नागरिकांनी घरातच थांबावं. बाहेर पडायचंच असेल तर मास्क घालून आणि सोशल डिस्टंस पाळून बाहेर जावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. जेवढी जास्त काळजी घेऊ तेवढे लवकर कोरोना संकटातून बाहेर पडू असं पोलीस आणि डॉक्टरांकडून वारंवार सांगितलं जात आहे. पण नागरिक ऐकणार नसतील तर कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे कोरोनाचे ८,३५९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३२२ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने कोरोनाच्या वाढत्या तीव्रतेमुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, नागपूर हे १४ जिल्हे रेड झोनमध्ये ठेवले आहेत. तर यगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, नंदूरबार हे १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आणि सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, वाशीम, वर्धा, गोंदिया आणि गडचिरोली हे ६ जिल्हे ग्रीन झोनमध्ये ठेवले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्य़ा जिल्ह्यात जाणंही टाळावं असं सरकारी यंत्रणांकडून वारंवार सांगितलं जात आहे.