Home शहरे उस्मानाबाद ग्रीन असूनही शेजारच्या रेड जिल्ह्यामुळे उस्मानाबाद मध्ये बससेवेला मनाई

ग्रीन असूनही शेजारच्या रेड जिल्ह्यामुळे उस्मानाबाद मध्ये बससेवेला मनाई

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ६ मे : राज्य सरकारने ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेला ग्रीन सिग्नल दिला असला तरी, जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात ही बस सेवा सुरू करण्या ऐवजी मनाई आदेश दिला आहे. शेजारील जिल्हे रेड आणि ऑरेंज झोन मध्ये असल्याचे निदर्शनास आणून देत जिल्हाधिकाऱ्यांनी हा मनाई आदेश जारी केला आहे.

राज्य सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. सोबत मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. यानुसार ग्रीन झोन क्षेत्रात बसच्या बैठक व्यवस्थेच्या पन्नास टक्के क्षमतेने बस सुरु करण्यास परवानगी आहे. ही सेवा फक्त ग्रीन झोनपूरतीच लागू आहे.

सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. मात्र शेजारील जिल्हे रेड व ऑरेज झोनमध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरु केल्यास या बसेस फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातच प्रवाशांची वाहतूक करु शकतील. बस स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची भीती व्यक्त करत लॉकडाऊन कालावधीत उस्मानाबाद जिल्हांतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा सुरु करण्यास मनाई करण्यात आली आहे.