Home ताज्या बातम्या ‘होम क्वारंटाइन’दिल्लीहून आलेले विद्यार्थी

‘होम क्वारंटाइन’दिल्लीहून आलेले विद्यार्थी

पुणे – दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे 325 विद्यार्थी पुण्यात सुखरूप दाखल झाले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली असून, विद्यार्थ्यांपैकी कोणीही कोविड-19 संदर्भातील संशयित आढळले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांचा अभ्यास करणारे राज्यातील विद्यार्थी शनिवारी रात्री पुण्याकडे दिल्ली रेल्वे स्टेशनहून विशेष ट्रेनने पुण्याकडे रवाना झाले. हे विद्यार्थी सोमवारी पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी पुण्यात पोहोचले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 97 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

पुणे स्टेशनवर सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात असून, सर्व विद्यार्थ्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यांत एसटीतून पाठवण्यात आले. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांना पीएमपी बसने पाठवण्यात आले असून, काही विद्यार्थी स्वत:च्या वाहनाने घरी गेले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली