Home ताज्या बातम्या एकाशे बावीस किलो गांजासह एकोणचाळीस लाखांचा ऐवज जप्त

एकाशे बावीस किलो गांजासह एकोणचाळीस लाखांचा ऐवज जप्त

0

पुणे : पोलीस आयुक्त व सह आयुक्तांच्या आज्ञेवरून अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (पश्चिम)चे पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक यांना विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश येथून सोलापूर रोडने पहाटेच्या वेळी सदर मालाची वहातूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी २४ मे रोजी पहाटेच्या वेळी महाराष्ट्र द्राक्ष बागायत संघ कमानीसमोर, सोलापूर रोड, हडपसर येथे सापळा लावून माल वाहून नेणारी स्कोडा कार चालक समीर शेख (वय ३७, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) याला ताब्यात घेऊन ४८ किलो गांजा जप्त केला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याची दोन माणसे आणखी गांजा घेऊन पुढे मुंबईच्या दिशेने गेली असल्याचे समजले. त्याच्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांच्याशी संपर्क साधल्यावर उपायुक्तांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांद्वारे खानापूर टोलनाका येथे सापळा लावला. तसेच खानापूर पोलिसांच्या मदतीने मोहितेंनी अशोक लेलँड टेम्पो ताब्यात घेऊन अश्विन दानवे, हिनायत शेख (दोघेही रा. अंधेरी पूर्व, मुंबई) यांना ताब्यात घेऊन ७२ किलो गांजा जप्त केला. तसेच लोणी काळभोर येथे लपवलेल्या बलेरो पिक अप गाडीसह शहाबाज खान (वय २८, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) व तौफिक शेख (वय ३१, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) यांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १२२ किलो गांजा, १ स्कोडा व १ बलेरो कार आदी ३९ लाखांचा माल जप्त केला आहे. त्यांच्याकडे दोन बनावट नंबर प्लेट्सही मिळाल्या आहेत. त्यांना लष्कर न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधिशांनी २९ मेपर्यंत पोलीस कोठडीपर्यंत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदर कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (पश्चिम) गुन्हेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक, संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी प्रमोद मगर, रमेश गरूड, पांडुरंग वांजळे, उदय काळभोर, मनोज शिंदे, विजय गुरव, सुनील चिखले, फिरोज बागवान, मंगेश पवार, अमोल पिलाणे, मोहन येलपले यांनी केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड पुढील तपास करीत आहेत.