Home ताज्या बातम्या लोणावळा शहरात ७४ वर्षीय व्यक्तीला करोनाचा संसर्ग

लोणावळा शहरात ७४ वर्षीय व्यक्तीला करोनाचा संसर्ग

लोणावळा : पर्यटन नगरी लोणावळा शहरात खंडाळा येथील एका ७४ वर्षीय व्यक्तीला बुधवारी करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने खंडाळा व लोणावळ्यात खळबळ उडाली आहे. लोणावळा नगरपालिका व पोलीस प्रशासनाने ६० दिवस अहोरात्र परिश्रम घेत अद्यापपर्यंत लोणावळा व खंडाळ्यात करोनाचा शिरकाव करून दिला नव्हता. मात्र अखेर बुधवारी करोनाने लोणावळा शहरात प्रवेश केलाच. यामुळे आता याचा संसर्ग अजून वाढू नये यासाठी लोणावळा नगरपालिका व पोलीस प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आहे.

संबंधित व्यक्तीला करोनाचा संसर्ग कसा आणि कोणाकडून झाला याबाबत नगरपरिषदेने शोध सुरू केला असून, संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. चार पाच दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीला ताप आल्याने ते लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी संबंधित व्यक्तीला करोनाची लक्षणे दिसू लागतात त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आले होते. बुधवारी त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येताच मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व स्थानिक नगरसेवकांनी खंडाळ्यात धाव घेत घेतली.

संबंधित व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रशासनाकडून सुरू करण्यात आला असून संबंधिताच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच संबंधित व्यक्ती लोणावळा शहरातील ज्या स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती तेथेही या कालावधित उपचार घेणार्‍यांची व इतरांची माहिती मिळविण्याचे काम प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.