Home ताज्या बातम्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना फेस मास्क परिधान करणे बंधनकारक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना फेस मास्क परिधान करणे बंधनकारक

पुणे: करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना दक्षतेबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने फेस मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून तोंड व नाक झाकलेले राहील. फेस मास्क नसलेल्या व्यक्तींना कार्यालयात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाचे कुुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आज काढले आहे. विद्यापीठ प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून या सूचना करण्यात आल्या आहेत. करोनाच्या फैलावामुळे सार्वजनिक ठिकाणी आता स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. यानुसार विभागातील सर्व खोल्यांमधील दारे आणि खिडक्‍या उघड्या करून ठेवाव्यात. पंखे सुरू ठेवावेत.

स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी पाणी आणि साबण उपलब्ध असणे आवश्‍यक राहील. तसेच कार्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी वारंवार आपले हात साबण-पाण्याने स्वच्छ धुवावेत अथवा सॅनिटायझर वापरावे. कार्यालयामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. कार्यालयामध्ये प्रत्येक ठिकाणी पिशव्या घालून पायाने झाकण उघडणाऱ्या कचराकुंड्या उपलब्ध असाव्यात, कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना वारंवार हात धुण्यासाठी सूचना देण्यात याव्यात अशा सूचना कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केल्या आहेत.

विद्यापीठातील प्रत्येक कर्मचाऱ्याची आरोग्यविषयी चौकशी करण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना ताप, घसा दुखणे, खोकला किंवा कोरडा खोकला असल्यास ताबडतोब आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवावेत. तसेच कार्यालयातील कोणी परगावावरून आले असल्यास त्यांना आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात यावे व त्यांना 14 दिवस घरी राहण्याबाबत सांगणे, अनावश्‍यक प्रवास टाळण्याबाबत सूचना कराव्यात, असेही पवार यांनी नमूद केले आहे.