Home ताज्या बातम्या अग्निशमन दलाची जिगरबाज कामगिरी,हॉटेल फार्च्युनमधील आगीतून 28 डॉक्टरांची सुखरूप सुटका

अग्निशमन दलाची जिगरबाज कामगिरी,हॉटेल फार्च्युनमधील आगीतून 28 डॉक्टरांची सुखरूप सुटका

मरीन लाइन्स येथील फॉर्च्युन हॉटेलमध्ये बुधवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीतून मुंबई अग्निशमन दलाने २८ डॉक्टरांची सुखरूप सुटका केली. आगीची वर्दी मिळताच दहा मिनिटांतच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केल्याने मोठा अनर्थ टळला. जे. जे. रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करणारे हे डॉक्टर आहेत.

मरीन लाइन्स परिसरातील फॉर्च्युन हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावर बुधवारी रात्री ११ वाजता आग लागली. या हॉटेलमध्ये ४० डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यातील बारा डॉक्टर नाईट शिफ्टसाठी जे. जे. रुग्णालयात हजर होते. तर २८ डॉक्टर हॉटेलवर होते. रात्री अचानक आधी लाइट गेली आणि त्यातच आगीची ठिणगी पडली. दुसर्‍या मजल्यावर लागलेली आग चौथ्या मजल्यापर्यंत वेगाने पसरली. त्यामुळे डॉक्टरांची प्रचंड धावपळ उडाली. मात्र आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास सुरुवात करून सर्व डॉक्टरांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन दलप्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध सुरू असल्याचेही रहांगदळे म्हणाले. दरम्यान, रेस्क्यू केलेल्या डॉक्टरांची व्यवस्था हॉटेल ट्रायडंटमध्ये करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

चौथ्या मजल्यावर अडकले होते चार डॉक्टर
आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनीही तातडीने बचावकार्य सुरू करून काही जणांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी निर्माण झालेल्या मोठ्या प्रमाणातील धुराच्या लोळांमुळे बचावकार्यातही अडथळे येते होते. यावेळी अग्निशमन दलानेही तातडीने बचावकार्य सुरू केले. यावेळी चौथ्या मजल्याव चार डॉक्टर अडकले होते. या डॉक्टरांची अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली.

दीड तासांत आग नियंत्रणात
आगीची माहिती मिळताच दहाव्या मिनिटाला अग्निशमन दल १२ बंब, उंच शिड्या आणि आवश्यक साधनसामग्रीसह दाखल झाले. आग लागल्यानंतर भडका आणखीनच वाढत गेल्याने अठराव्या मिनिटाला आग ‘लेव्हल – २’ची असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र १२.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. तर १.३८ मिनिटांनी आग पूर्णपणे विझली. कूलिंग ऑपरेशन रात्री उशिरापर्यंत सुरू होते अशी माहिती उप प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी दिली