Home शहरे अमरावती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरु करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व आवश्यक संसाधनांचा उपयोग करुन शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण परिषदेच्या सूचनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले जाईल व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन भवन येथे राज्यमंत्री श्री.कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणजीत पाटील, महानगरपालिकेचे शिक्षण सभापती गोपाळभाऊ धर्माळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, सहायक शिक्षण संचालक तेजराव काळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलीमा टाके, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्यासह शासकीय, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, खासगी शाळांचे संचालक व विविध शिक्षण संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री.कडू म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग देशभर झालेला आहे. या संकटकाळात विद्यार्थ्यांना बाधा होऊ नये म्हणून सद्य:स्थितीत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. या विषाणूने हजारो किलोमीटरचा टप्पा पार करुन देशात प्रवेश केला आहे. देशातून राज्यात व राज्यातून शहरात तसेच शहरातून गावात याचा शिरकाव झाला आहे. विषाणू प्रतिबंधासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत आहेत. आरोग्य यंत्रणा रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. परंतू, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. जून महिन्यात शाळा, महाविद्यालयांची शैक्षणिक सत्रे सुरु होतात. परंतू कोरोना विषाणूचा संक्रमितांचा आकडा वाढू नये यासंदर्भात दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते.

ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे शहराच्या ठिकाणी शक्य आहे. परंतू ग्रामीण भागात शेतकरी, मजूर वर्गाच्या पाल्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान व स्मार्ट फोन आदींची अडचण आहे. त्यामुळे शैक्षणिक विषमताही निर्माण होता कामा नये. त्यामुळे शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी सर्व शाळा सुरु करण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा कशा सुरु करता येईल, कोविड आजाराबाबत सर्व प्रतिबंध, दक्षतेचे नियम पाळून विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल, यासाठी शिक्षण विभागाद्वारे धोरणात्मक निर्णय घेऊन प्रयत्न करण्यात येईल. 

विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपून व निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरु करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ. शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला आहे. या प्रारुप आराखड्याच्या अनुषंगाने शिक्षण परिषदेत प्राप्त झालेल्या सूचनांचा उपयोग नक्कीच होईल. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना अवगत करण्यात येईल, असेही श्री. कडू यांनी सांगितले.

परिषदेत कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे स्वरुप व कार्यपद्धती याविषयी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ शासकीय व खासगी शाळांचे व्यवस्थापन, विविध शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांच्याकडून प्राप्त सूचनांचा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे स्वरुप व कार्यपद्धतीच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय होण्यासाठी उपयोग होईल, असे श्री. कडू यांनी सांगितले.

शिक्षण परिषदेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संघटनेसह इतर विविध शिक्षण संघटनेच्या प्रतिनिधींशीही चर्चा करून राज्यमंत्र्यांनी त्यांची मते जाणून घेतली.